पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमरिंदर सिंग यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली आहे. डोवाल यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी अमरिंदर सिंग यांनी ही भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.
आपल्या क्षमतांवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा विश्वास नसल्याने आपल्याला अपमानित वाटत आहे, असं कारण देत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. गेल्या काही दिवसात पंजाबमधील राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असल्या तरी अमरिंदर सिंग यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. गेल्या अनेक दशकांपासून गांधी घरण्याशी एकनिष्ट आणि विश्वासू असलेले अमरिंदर सिंग यांनी बंड केल्यास काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. अमित शाह आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात जवळपास ४५ मिनिटं चर्चा झाली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ट्वीट करून शेतकरी आंदोलनावर चर्चा झाल्याची माहिती दिली. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. कृषि कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर चर्चा झाली. पीक विविधीकरणात पंजाबला पाठिंबा देण्याव्यतिरिक्त कृषि कायदे रद्द करावे आणि एमएसपी हमीसह संकट त्वरित सोडवण्याची विनंती केली”, असं ट्वीट त्यांनी केलं होतं.
न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार अमरिंदर सिंग यांनी काही महत्वाची कागदपत्र अजित डोवाल यांच्याकडे सुपूर्द केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र ही कागदपत्रं नक्की कशासंदर्भात आहेत याबद्दल खुलासा होऊ शकतेलेला नाही. भारत पाकिस्तान सीमेवर असणाऱ्या पंजाबसारख्या राज्यामध्ये काँग्रेसने नवज्योत सिंग सिद्धू सारख्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष पद देणं हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याची टीका अमरिंदर सिंग यांनी यापूर्वीच केली होती.