केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कोर्डेलिया क्रूझवर पार्टी करण्यासाठी अंमलीपदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्याप्रकरणी केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने कार्यक्रम आयोजन करणाऱ्या कंपनीशी संबंधित चौघांसह आठ जणांना अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १६ वर पोहोचली आहे. यात कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कंपनीशी संबंधित चार  व्यक्तींसह दोन विक्रेत्यांचा समावेश आहे. असं असतानाच आता या क्रूझ कंपनीने नवरात्रीच्या मुहूर्तावर धार्मिक पर्यटनाच्या क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.

मंगळवारी कंपनीने नवरात्री निमित्त खास टूर पॅकेजची घोषणा केलीय. कंपनीकडून पाठवण्यात आलेल्या या आमंत्रणांमध्ये क्रूझवर नवरात्रीनिमित्त संगीताचा कार्यक्रम, नाच आणि स्टॅण्डअप कॉमेडीचं आयोजन करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच संपूर्ण रात्रभर पार्टी करण्याची संधीही या स्पेशल पॅकेजमध्ये देण्यात येणार असल्याचा उल्लेख यात आहे. नऊ दिवस शाकाहारी जेवणाबरोबरच एका धार्मिक स्थळालाही भेट देण्यात येणार आहे.

नक्की वाचा >> “क्रूझवरील छोटे मासे पकडण्यात व्यस्त असणारी NCB अदानींच्या बंदरावर सापडलेल्या ३००० किलो हिरॉईनसंदर्भात मात्र…”

काय आहे पॅकेजमध्ये?
कंपनीने नवरात्री विशेष पॅकेजमध्ये क्रूजवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आनंद पाहुण्यांना घेता येणार असल्याचं सांगतानाच सोमनाथ मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी क्रूझ बंदरावर थांबवली जाणार असल्याचंही म्हटलं आहे. क्रूझ कुठे कुठे थांबा घेणार आहे त्या शहरांच्या यादीमध्ये सोमनाथचं नाव आहे. विशेष म्हणजे या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये क्रूझवर पूर्णपणे शाकाहारी जेवण दिलं जाणार आहे. या क्रूझमध्ये मोठं फूड कोर्ट असून त्यात तीन स्पेशल रेस्टॉरंट आणि चार बारचा समावेश आहे.

क्रूझवर काय काय सापडलं?
आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर ‘एनसीबी’ने शनिवारी ही कारवाई केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आले आहेत. सशयितांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

कारवाईनंतर मालक काय म्हणाले?
या कारवाईसंदर्भात कोर्डेलिया क्रूझचे मालक जुर्गेन बैलोम म्हणाले, की या प्रकरणाशी  कोर्डेलिया क्रूझचा कोणताही संबंध नाही. आम्ही अशा कृत्यांचा निषेध करत असून भविष्यात  असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रयत्नशील राहू.

कोणाच्या मालकीची आहे ही क्रूझ?
कोर्डेलिया क्रूझ वॉटरवेज लेझर टूरिझम प्रायव्हेट लिमिटेडची आहे. या क्रूझमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या क्रूझमध्ये पार्टी करण्यासाठी आणि मित्रांसोबत एन्जॉय करण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. अनेक जण या क्रूझमध्ये प्रवास करतानाचे फोटो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करताना दिसतात.

क्रूझवर कोणकोणत्या सुविधा आहेत?
या क्रुझमध्ये एका फिटनेस सेंटरचाही समावेश आहे. त्यासोबतच स्पा, सलून याचीही यात सुविधा देण्यात आली आहे. यासोबत या क्रूझमध्ये एक कसिनो आणि थिएटरही देण्यात आले आहे. तसेच मोठा स्विमिंगपूल, नाईटक्लब, लाईव्ह बँड, डिजे यासारख्या सुसज्ज सुविधाही यात देण्यात आल्या आहे. 

भाडं किती?
या क्रूझवर इतक्या सुविधा दिल्या गेल्या असल्या तरी त्याचे पॅकेज फार महाग आहे. कॉर्डेलिया क्रूझचे टूर पॅकेज १७७०० पासून सुरू होते. हा दर केवळ एका रात्रीसाठी आहे. कॉर्डेलिया क्रूझचे दोन रात्रीचे दोन जणांसाठीचे मुंबई ते गोवा टूर पॅकेज ५३१०० रुपये आहे. तर, दोन जणांसाठी दोन रात्रीचे हाय सी पॅकेज ३५४०० रुपये आहे.