अजून एक लाख वर्षांनी माणूस कसा दिसत असेल, याची कल्पना फारशी कुणी केली नसेल पण दोन संशोधकांनी मात्र त्याचे उत्तर त्यांच्या ज्ञानाआधारे देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते एक लाख वर्षांनी माणसात बरेच बदल झालेले असतील. त्याचे डोके मोठे असेल, डोळे मोठे असतील व त्याची निशादृष्टी सुधारलेली असेल. थोडक्यात तो पोकेमॉन सारखा दिसेल.
कलाकार-संशोधक असलेल्या निकोले लॅम यांनी न्यूयॉर्क डेली न्यूजला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी माणूस आणखी एक लाख वर्षांनी कसा दिसत असेल याचे कल्पनाचित्र तयार केले आहे व ते तर्काधिष्ठित आहे, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या मते या माणसाचे डोळे गुगल ग्लास प्रकारच्या काँटॅक्ट लेन्ससारखे असतील व डिस्नेच्या पात्रांचे डोळे जसे बाजूने चमकतात तसे हिरव्या रंगाने चमकतील. मांजरीसारखी निशादृष्टी त्यांना लाभलेली असेल.
सुबक असेल माणूस
लॅम यांनी सांगितले की, जेव्हा एक लाख वर्षांनी माणूस कसा असेल याची रचना तयार करायला घेतली तेव्हा आपण अगदी हुबेहूब माणूस कसा असेल हे सांगण्याचे ठरवले नव्हते. जनुकशास्त्रज्ञ अॅलन क्वॉन यांची मदत आपण यात घेतली. मानवी शरीरातील काही घटकही नियंत्रित करून झायगोटिक जिनोम इंजिनियरिंग तंत्राने उत्क्रांतीच आपण आपल्या हातात ठेवू शकू अशी ही एक कल्पना आहे. मानवी जीवशास्त्राचा वापर मानवी गरजांसाठी करून नैसर्गिक उत्क्रांतीची प्रक्रियाच नियंत्रित करता येऊ शकेल असे क्वान यांचे मत आहे.
मोठे डोके, तीक्ष्ण डोळे अन् काळी त्वचा
क्वान यांच्या मते मानवी डोके मोठे होईल कारण त्यात मोठय़ा आकाराचा मेंदू सामावणे गरजेचे आहे कारण ज्ञानाच्या विस्ताराबरोबरच डोकेही मोठे होत जाणार आहे. पुढे माणूस अवकाशात अशा ठिकाणी जाईल की, जी ठिकाणे सूर्यापासून दूर असतील तिथे अंधार असेल त्यामुळे त्याचे डोळेही विस्तारलेले असतील व त्यांना जास्त क्षमता असतील, त्याची त्वचा काळी असेल कारण अतिनील किरणांपासून संरक्षण मिळवायचे असेल तर ते आवश्यक आहे. घुबड जसे डोळे बाजूने मिचकावते तशी क्षमता त्याला असेल कारण वैश्विक किरणांपासून रक्षण करण्यासाठी ते आवश्यक आहे.
एक लाख वर्षांनंतरचा माणूस पोकेमॉनसारखा
अजून एक लाख वर्षांनी माणूस कसा दिसत असेल, याची कल्पना फारशी कुणी केली नसेल पण दोन संशोधकांनी मात्र त्याचे उत्तर त्यांच्या ज्ञानाआधारे देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते एक लाख वर्षांनी माणसात बरेच बदल झालेले असतील.
First published on: 10-06-2013 at 03:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After one lakh years man will look like pokemon