पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सैनिकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सर्व केंद्रीय सुरक्षा दलांना आता जम्मूहून श्रीनगरला नेण्यासाठी विमान प्रवासाची सेवा पुरवली जाणार आहे.

गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार आता बीएसएफ, आसाम रायफल्स, सीआरपीएफ, सीआयएसएफ, एसएसबी, एनएसजी आणि आयटीबीपीच्या जवानांना काश्मीर खोऱ्यात तैनातीसाठी हवाईमार्गे श्रीनगरला नेलं जाणार आहे. सुट्टीवर जाताना, सुट्टीवरुन परतताना किंवा सुरक्षा दलाच्या पथकाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी हवाईमार्गाचा वापर केला जाणार आहे. दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली आणि जम्मू-श्रीनगर व श्रीनगर-दिल्ली या मार्गावर विमान सेवेचा वापर केला जाईल.  जवळपास 7 लाख 80 हजार जवानांना याचा लाभ मिळणार, केंद्रीय गृहमंत्रालयाचा हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे. यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सुट्टीवरुन परतणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. यामध्ये 40 हून अधिक जवान शही झाले. सैनिकांवर भविष्यात पुन्हा अशाप्रकारचे हल्ले  होऊ नयेत यासाठी सैनिकांना विमान प्रवासाची सेवा सुरू करण्यात आली आहे.

Story img Loader