हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, पण स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान काही विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केले आणि ते आता सहन केले जाणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी म्हटले होते. वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन,या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राजनाथ सिंह यांनी हे विधान केले. त्यावरुन आता गांधी-सावरकरांच्या वंशजांनी याबाबत भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी राजनाथ सिंह यांचा फार ऋणी आहे कारण आम्ही जे कित्येक वर्षापासून सांगत होतो की सावरकरांना माफी मागायची सवय होती त्याची पुष्टी त्यांनी केली. म्हणून मी त्यांचा आभारी आहे की शेवटी त्यांना सत्य मानावे लागले आणि त्यांनी महात्मा गांधीचे समर्थन केले यासाठीही ऋणी आहे. जेव्हा सावरकरांनी प्रथम माफीनामा दिला तेव्हा महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह करत होते. त्यांचे लक्ष भारतावर नव्हते. पण त्यावेळीही सावरकरांवर त्यांचा पगडा होता हे सांगण्यासाठीही मी राजनाथ सिंह यांचे आभार मानतो. असे नविन इतिहासकार आपल्या समोर येत आहेत त्यांचे स्वागत आहे,” असे महात्मा गांधी यांचे वंशज तुषार गांधी यांनी साम टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत  म्हटले आहे.

गांधींचा उल्लेख केल्याशिवाय त्यांचे पाऊल पडत नाही

राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य करून काय साधले असा सवाल यावेळी मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने केला त्यावर तुषार गांधी यांनी भाष्य केले आहे. “गांधी त्यांना इतके खटकतात की, कोणतीही बाब असूद्या गांधींचा उल्लेख केल्याशिवाय त्यांचे पाऊल पडत नाही. यांचीच मजबुरी महात्मा गांधी आहे आणि त्यांच्याशिवाय ते जगू शकत नाहीत. त्यांच्यावर गांधींचा इतका मोठा प्रभाव आहे ही गोष्ट छान आहे. ज्या विचारधारेने गांधीजींची हत्या घडवून आणली त्या विचारधारेचे लोक कोणतीही बाब असूद्या महात्मा गांधीचे नाव घ्यावे लागते. सावरकरांचे उदात्तीकरण करताना पण त्यांना महात्मा गांधीचा आधार घ्यावा लागतो,” अशी प्रतिक्रिया तुषार गांधी यांनी दिली.

सावरकरांनी जे अर्ज केले ते गांधींना मान्य होते

यावेळी सावरकारांचे वंशज रणजीत सावरकर यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “राजनाथ सिंह यांनी माफीनामा हा शब्द न वापरता अर्ज हा शब्द वापरला आहे. ब्रिटिश सरकारच्या कागदपत्रांमधील सर्व अर्ज पुस्तकांमधून समोर आणण्यात आले आहेत. त्यामुळे ब्रिटिशांनी सुद्धा मान्य केले आहे की अर्ज आहेत. गांधीचा सल्ला घेणे त्यांना अशक्य होते पण गांधींनी सावरकरांची सुटका व्हावी यासाठी दोन लेख लिहिले आहेत. त्यामध्ये त्यांनी आम्ही शांततेच्या मार्गाने जात आहोत आणि ते हिंसेच्या मार्गाने जात आहेत यावरुन भांडण होते. जर ते शांततेच्या मार्गाने जात असतील तर मी स्वागत करतो आणि सावरकर बंधूंची सुटका व्हायला पाहिजे, देशासाठी त्यांनी प्रचंड त्याग केला आहे. देशाची जी सेवा केली आहे त्याची शिक्षा ते अंदमानात भोगत आहे असे लेखात स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे सावरकरांनी जे अर्ज केले ते गांधींना मान्य होते आणि सावकरांच्या अर्जांना गांधीचा पाठिंबा होता,” असे रणजीत सावरकर यांनी म्हटले आहे.

तुम्ही माफीनाम्याला अर्ज सांगा ही कोणती लाचारी आहे

यावर तुषार गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी हे कबुल करतो की गांधीना सावकरांसाठी चिंता वाटत होती आणि शक्य असते तर त्यांनी नथुराम गोडसेला सुद्धा शिक्षा होऊ नये म्हणून अर्ज केला असता. कोणाचाही सूड घेण्याचा त्यांचा विचार नव्हता. म्हणून सावकरांबाबतही सहानुभूती आणि चिंता व्यक्त केली हे त्यांच्या प्रकृतीचे एक उदाहरणच आहे. तुम्ही माफीनाम्याला अर्ज सांगा ही कोणती लाचारी आहे. त्याबाबत माझी काही सांगण्याची आवश्यकता नाही,” असे तुषार गांधी म्हणाले.

ब्रिटिशांचे आमच्यावर उपकार आहेत हे गांधींसारखा नेता हजार वेळेला म्हणतो

तुम्ही इतिहासाचा अभ्यास करा. गांधींची पत्रे तुम्ही स्वतः वाचा अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी रणजीत सावरकर यांनी दिली. “ब्रिटिश साम्राज्य आहे म्हणून आम्ही आहोत, ब्रिटिशांचे आमच्यावर उपकार आहेत हे गांधींसारखा नेता हजार वेळेला म्हणतो. त्यामुळे तुम्ही ही भाषा बंद करा. तुम्ही स्वतःला इतिहासकार म्हणवता हे चुकीचे आहे. तुम्ही राजकीय लेखक आहात. तुमची मते राजकीय भूमिकेतून मांडा,” अशी प्रतिक्रिया रणजीत सावरकर यांनी दिली.

त्यावर, खोटे बोलावे लागते म्हणून जोरात आरडोओरड करुन बोलावे लागते. आम्ही सत्य फार सहज पद्धतीने सांगू शकतो. राजनाथ सिंह सारख्या सत्यवादी लोकांसोबत मला माझी तुलना करायची नाही. मी जो इतिहास लिहितो तो तुम्हाला कधीच आवडणार नाही, अशी प्रतिक्रिया तुषार गांधी यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After rajnath singh statement rift between the descendants of gandhi and savarkar abn