नितीशकुमार यांच्याकडून पोलिसांचे कौतुक
भगवान महावीरांची २६०० वर्षांपूर्वीची अमूल्य मूर्ती नऊ दिवसांपूर्वी बिहारमधील जामुई जिल्ह्य़ातील खेडय़ातून चोरीस गेली होती ती सापडली आहे. ही मूर्ती ताबडतोब शोधली जावी यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दूरध्वनी केला होता. अडीचशे किलोची ही मूर्ती आहे.
जामुई येथून पोलीस महानिरीक्षक बच्चूसिंग मीणा यांनी सांगितले की, आज सकाळी सहा वाजता आम्हाला ही मूर्ती सापडली आहे. बच्चूसिंग हे मूर्ती शोधण्यासाठी आठवडाभर जामुई येथे तळ ठोकून होते. त्यांनी व्यक्तीगत पातळीवर तपासाची देखरेख ठेवली. ज्या टोळीने मूर्ती चोरली होती त्यांच्यातील एकाने पोलिसांना दूरध्वनी करून ती मूर्ती बिछवे खेडय़ातील शेतात पडली आहे अशी माहिती दिली. पोलिसांनी आज सकाळी ही मूर्ती तेथून ताब्यात घेतली.
मीणा यांनी सांगितले की, चोरटय़ांनी मूर्ती विकण्याचे ठरवले होते, पण चौकशीच्या दबावामुळे ते तसे करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांनी ती मूर्ती शेतात टाकून दिली. या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्या टोळीविरोधात कुठलेही पुरावे नाहीत. ही मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती जामुई जिल्ह्य़ातील जैन मंदिरातून २७ नोव्हेंबरला चोरीस गेली होती. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्याबाबत मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दूरध्वनी करून तपासातील प्रगतीची माहिती घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी अगोदर या प्रकरणी चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली होती, नंतर त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मूर्ती सापडवल्याबद्दल बिहार पोलिसांचे कौतुक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा