Swati Sachdeva Video Viral: बियरबायसेप या नावाने प्रसिद्ध असलेला युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने पालकांवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर त्यावर जोरदार टिका झाली होती. समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या युट्यूब शोमध्ये सहभागी झाल्यानंतर रणवीर अलाहाबादियाने आई-वडिलांबाबत नको ते विधान केले होते. त्याच्या या विनोदानंतर एकज गजहब उडाला. त्यानंतर आता आणखी एक कॉमेडियनच्या विनोदावर वाद सुरू झाला आहे. स्टँड-अप कॉमेडियन स्वाती सचदेवाने एका शोमध्ये पालकांवर विनोद केला. यावर आता टीका होत आहे.

स्टँड-अप कॉमेडियन स्वाती सचदेवाने तिच्या एका शोमध्ये आईवर विनोद केला. आईला घरात वायब्रेटर (सेक्स टॉय) सापडल्यानंतर पुढे काय होते? यावर स्वाती सचदेवाने आक्षेपार्ह विनोद सादर केला. या विनोदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. विनोदपटू (कॉमेडियन) आता मर्यादा ओलांडत असून पालकांवरच अभद्र विनोद करत आहेत, अशी प्रतिक्रिया इंटरनेटवर व्यक्त केली जात आहे.

यूट्यूबर रणवीर अलाहाबादियानेही समय रैनाच्या शोमध्ये एका स्पर्धकाला नको तो प्रश्न विचारला होता. “तू तुझ्या पालकांना शरीरसंबंध ठेवताना रोज पाहशील का? किंवा त्यांच्यात सामील होऊन त्यांना आयुष्यभर तसे करण्यापासून रोखशील?”, असा प्रश्न रणवीर अलाहाबादियाने विचारला होता. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रणवीर अलाहाबादियाच्या विरोधात एफआयआर दाखल झाला होता. तसेच सोशल मीडियावर त्याच्याविरोधात संताप व्यक्त केला गेला.

रणवीर अलाहाबादियाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते. तर समय रैनालाही पोलिसांच्या नोटिशीला उत्तर द्यावे लागले. त्यांतर आता स्वाती सचदेवाच्या विनोदावर चर्चा होत आहे. विनोदवीरांनी कुटुंबाला विनोदापासून दूर ठेवायला हवे, असे अनेक लोक म्हणत आहेत.

स्वाती सचदेवाने वायब्रेटरबद्दल (सेक्स टॉय) केलेल्या विनोदात आई-वडिलांना खेचले आहे. अनेकांना तिचा विनोद रुचला नाही. एका एक्स युजरने म्हटले, “स्वाती सचदेवा निर्लज्ज मुलगी आहे. तिने विनोदाच्या नावाखाली अश्लीलता पसरविण्याचा प्रयत्न केला. पैशांच्या हव्यासापोटी विनोदवीर त्यांच्या पालकांनाही सोडत नाहीत.”

आणखी एका युजरने म्हटले की, स्वाती सचदेवा दिल्लीची असून तिने अमित्या विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. तरीही तिला नोकरी मिळाली नाही. मग तिने प्रौढांसाठीचा मजकूर लिहायला सुरूवात केली. स्वतःच्या आईचा अपमान करून ती पैसे कमवत आहे.

एका युजरने म्हटले की, समय रैना आणि रणवीर अलाहाबादियाची चौकशी करून झाली असेल तर आता स्वाती सचदेवाचा पुढचा क्रमांक आहे. “हल्ली विनोद म्हणजे फक्त अश्लील भाषा वापरणे, दुसरे काही नाही. काही लोक त्यावर हसतात. एका व्यक्तीने मला सांगितले की, हा काळाबरोबर अपग्रेड झालेला विनोद आहे. पण मला प्रश्न पडतो हा विनोद तरी आहे का?”, अशी खोचक टिप्पणी आणखी एका युजरने केली आहे.