Gold Smuggling Case : कन्नड अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिला बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती. सोने तस्करीच्या कथित प्रकरणात तिला ही अटक करण्यात आली आहे. दुबईहून परतत असताना महसूल गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली. त्यावेळी तिच्याकडे तब्बल १४.८ किलो सोनं आढळून आले होते. दरम्यान त्याच्या दुसर्याच दिवशी विमानतळावर पुन्हा मोठी सोने तस्करीचे प्रकरण उजेडात आले आहे.
दुबईहून ३.४४ कोटी रुपयांचे सोने तस्करी केल्याच्या आरोपाखाली एका दृष्टिहीन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे , अशी माहिती कस्टम अधिकार्यांनी शनिवारी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली. सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी बेंगळुरू विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाने रान्या राव हिला अटक केल्यानंतर दुसर्याच दिवशी, म्हणजेच ४ मार्च रोजी या अज्ञात व्यक्तीला अटक करण्यात आली.
कस्टम अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना गुप्त सूचना मिळाली होती आणि त्यानंतर या प्रवाशाला दुबईहून उतरताच अटक करण्यात आली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आले की, “तपासणी केली असता त्याच्या शर्टच्या खाली लपवलेले ३९९५.२२ ग्रॅम सोने, ज्याची किंमत ३४४३८७९६ रुपये आहे, जप्त करण्यात आले आणि तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.”
अभिनेत्री रान्या रावला ३ मार्च रोजी बेंगळुरू विमानतळावर तिच्या अंगावर लपवून सुमारे १२.५६ कोटी रूपये किमतीच्या सोन्याची दुबईहून भारतात तस्करी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
गेल्या काही वर्षात बंगळुरू विमानतळावर जप्त केलेले हे सर्वाधिक सोने आहे. या घटनेनंतर रान्या रावला ताब्यात घेण्यात आले आणि तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले, त्यानंतर तिची तीन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
रान्या राव हिने सहा महिन्यात दुबईला जवळपास २७ फेऱ्या केल्या. तसेच रान्या राव हिचा तस्करी नेटवर्कशी संबंध असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. तस्करी करून आणलेल्या एक किलो सोन्यामागे ती ४ ते ५ लाख रुपये कमवत होती. दरम्यान रान्या राव हिच्या अटकेनंतर बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्ष व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.