केरळमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली असून त्यांच्या हल्ल्यामुळे एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर, आजही एका मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. भटक्या कुत्र्यांचा हा त्रास अधिक वाढू लागल्याने कुन्नूरच्या जिल्हा पंचायतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
“कुन्नूर येथे ११ जून रोजी ११ वर्षीय मुलावर काही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला. असाच प्रकार गेल्यावर्षीही घडला होता. यामध्ये १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा त्रास शहरात वाढू लागला आहे”, असं जिल्हा पंचायतीने याचिकेत म्हटलं आहे.
२०१९ मध्ये ५७९४ भटक्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला केला होता. २०२० मध्ये ३९५१, २०२१ मध्ये ७९२७, तर, २०२२ मध्ये ११७७६ आणि १९ जून २०२३ पर्यंत ६२७६ भटक्या कुत्र्यांनी कुन्नूर जिल्ह्यांत नागरिकांवर हल्ले चढवले आहेत. तसंच, जिल्ह्यात जवळपास २८ हजार भटके कुत्रे असल्याचाही दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.
“भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी करण्याकरता स्थानिक पातळीवर बरेच प्रयत्न करण्यात आले आहेत. पंरतु, हे प्रयत्न तोकडे पडत असून कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत जात आहे. ६५ बदके आणि अनेक पाळीव प्राण्यांची या कुत्र्यांनी शिकार केली आहे”, असं या याचिकेत स्पष्ट करण्यात आलं आहे.
“भटक्या कुत्र्यांचा हा वाढता त्रास पाहता या कुत्र्यांची हत्या करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावेत”, अशी मागणी जिल्हा पंचायतीने याचिकेद्वारे केली आहे. वकिल बिजू पी. रामन यांच्याद्वारे ही याचिका करण्यात आली आहे.
आजही एकीला चावा
कुन्नूर जिल्ह्यात आजही एका मुलीवर कुत्र्यांनी हल्ला केला. जान्हवी असं नाव असलेल्या ११ वर्षीय मुलीवर हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.
जान्हवी तिच्या घराच्या परिसरात खेळत होती. त्यावेळी तीन भटके कुत्रे तिथे आले. ती एकटी खेळत असताना तिच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला. तिला खाली पाडलं आणि तिचा चावा घेण्यास कुत्र्यांनी सुरुवात केली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एक इसम तिथे आला. परंतु, तो भिंतीपल्याड असल्याने तो मुलीला वाचवण्यास जाऊ शकला नाही. त्यामुळे त्याने जोरात आवाज देत दुसऱ्या बाईला तिथे बोलावले. ती बाई तिथे येताच कुत्र्यांनी पळ काढला. दरम्यान, या घटनेत चिमुकली गंभीर जखमी झाली आहे.