स्वयंपाकाचा गॅस वापरणाऱ्या ग्राहकांच्या खात्यात सबसिडीची रक्कम थेट जमा करण्याची योजना १ जानेवारी २०१४ पासून देशातील २८९ जिल्ह्य़ांत राबविण्यात येणार आहे. सदर योजना पथदर्शक स्वरूपात प्रथम २० जिल्ह्य़ांत राबविण्यात आली होती. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून आणखी जिल्ह्य़ांत ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदर योजनेंतर्गत ग्राहकाच्या बँक खात्यात ४३५ रुपये अग्रिम स्वरूपात जमा करण्यात येणार असल्याने त्या ग्राहकाला १४.२ किलोचा गॅस सिलिंडर बाजारभावाने खरेदी करणे सुलभ होणार आहे. गॅस सिलिंडर घेतल्याबरोबरच ग्राहकाच्या आधार-संबंधित बँक खात्यात पुढील सिलिंडरची सबसिडी जमा केली जाणार आहे.
आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी, पश्चिम गोवा, हिमाचल प्रदेशातील सिमला, केरळमधील कोट्टायम, मध्य प्रदेशातील होशंगाबाद, महाराष्ट्रातील अमरावती आणि पंजाबमधील लुधियाना आदी ३४ जिल्ह्य़ांमध्ये ही योजना विस्तारित करण्यात आली असल्याचे अधिकृत निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
सदर योजनेचा १ जानेवारी २०१४ पासून आणखी २३५ जिल्ह्य़ांत टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे जवळपास निम्म्या देशात ही योजना नजीकच्या भविष्यात लागू होणार आहे. आधार क्रमांक मिळविण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ ग्राहकांना देण्यात आली असून त्यानंतर केवळ आधार क्रमांक असलेल्या ग्राहकांनाच सबसिडी मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा