आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन राजकारण तापले आहे. चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष आणि जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस या आंध्रमधील दोन प्रमुख पक्षांनी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला कोंडीत पकडले आहे. वायएसआर काँग्रेसने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार विरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडण्याची नोटीस दिल्यानंतर शुक्रवारी सकाळी चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने भाजपाप्रणित एनडीएमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. टीडीपीने भाजपाची साथ सोडल्यानंतर केंद्रातल्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणार ते आपण समजून घेऊया.
– नरेंद्र मोदी सरकारमधील टीडीपीच्या दोन मंत्र्यांनी मागच्या आठवडयात मंत्रिपदाचे राजीनामे दिले होते. त्यानंतर आज सकाळी टीडीपीने भाजपाची साथ सोडत असल्याचा निर्णय जाहीर केला.
– भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार २०१४ साली केंद्रात सत्तेवर आल्यानंतर प्रथमच या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
– ५३६ सदस्यांच्या लोकसभेत दोन नामनिर्देशित सदस्यांसह भाजपा खासदारांचे एकूण संख्याबळ २७५ आहे. भाजपाला अन्य घटक पक्षांच्या ५६ खासदारांचा पाठिंबा आहे.
– सभागृहातील ५० खासदारांचा पाठिंबा असेल तरच अविश्वास प्रस्तावाची नोटीस स्वीकारली जाऊ शकते.
– वायएसार काँग्रेसचे संसदेत नऊ खासदार आहेत तर टीडीपीचे १६ खासदार आहेत.
– टीडीपी आणि वायएसआर या दोन्ही पक्षांच्या खासदारांनी एकत्र येऊन अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा दिला तरी भाजपाकडे संसदेत सरकार तारण्यासाठी पुरेसे संख्याबळ आहे.
– २०१९ लोकसभा निवडणुकीपर्यंत हीच स्थिती कायम राहिली तर मात्र भाजपाला फटका बसू शकतो.
– वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी विविध पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. मोदी सरकारने आंध्रला विशेष दर्जा देण्याची मागणी मान्य केली नाही तर ६ एप्रिलला आपल्या पक्षाचे सर्व खासदार राजीनामा देतील असे जगनमोहन रेड्डी यांनी पत्रात म्हटले आहे.
– टीडीपीचे खासदार थोटा नरसिम्हा यांनी आपला पक्ष अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. आंध्रमध्ये वायएसआर टीडीपीचा मुख्य स्पर्धक आहे.
– उत्तर प्रदेश लोकसभा पोटनिवडणुकीत फुलपूर आणि गोरखपूर या दोन मतदारसंघातील पराभवानंतर लोकसभेतील भाजपाचे संख्याबळ २७५ झाले आहे. २०१४ साली लोकसभेची निवडणूक जिंकली तेव्हा भाजपाचे संख्याबळ २८२ होते.