पंजाबमध्ये अतिरेक्यांनी भारतीय लष्कराचे गणवेश परिधान करून लागोपाठ केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता सैन्यदलाचे गणवेश घालण्यावर आणि त्याची विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पठाणकोट हल्ल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पठाणकोटच्या हवाईतळावर सैन्यदलाच्या गणवेशात दहशतवादी आत घुसले होते. सैन्यदलाच्या गणवेशाचा गैरफायदा रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सामान्य नागरिकांनी भारतीय लष्काराचे कपडे परिधान करू नयेत आणि दुकानदारांनी त्याची विक्री करू नये, असे आवाहनही भारतीय लष्कराने केले आहे.
लुधियाना येथील चौरा बाजारात अनेक दुकानांमध्ये लष्काराचे गणवेश सर्रासपणे विक्रीला ठेवण्यात येतात. लष्करातील निवृत्त आणि सध्या नोकरीत असणाऱ्या जवानांकडून दुकानदारांना हे गणवेश मिळतात. अनेकदा जुने कपडे गोळा करणाऱ्यांकडून वापरात नसलेले लष्करी गणवेश याठिकाणी आणले जातात. दिल्ली आणि लखनऊ यांसारख्या ठिकाणांहूनदेखील हे गणवेश आणले जात असल्याचे एका दुकानदाराने सांगितले. पठाणकोट हल्ल्याच्या काही दिवस अगोदरच लुधियानातील भंगार बाजारातून लष्काराचे गणवेश, बुट, बॅग, तंबू, पायमोजे आणि टोप्यांची विक्री करण्यात आल्याची माहिती आहे.
लष्कराचा गणवेश ही जवानांसाठी अभिमानाची गोष्ट असते. मात्र, अनेकदा सरकारकडून जवानांना देण्यात येणार गणवेश त्यांच्या मापाचे नसतात. असे गणवेश घेऊन जवान काय करणार?, याउलट बाहेर बाजारात जवानांना चांगले गणवेश शिवून मिळतात व त्यांचा दर्जाही चांगला असतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, पठाणकोट हल्ल्ल्यानंतर येथील दुकानदारांनी लष्कराच्या गणवेशांची विक्री बंद केली आहे.
पठाणकोट हल्ल्यानंतर भारतीय लष्कराचा गणवेश वापरण्यावर बंदी
अनेकदा सरकारकडून जवानांना देण्यात येणार गणवेश त्यांच्या मापाचे नसतात.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 09-01-2016 at 15:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After terror attacks in punjab army uniforms once sold openly now disappear