भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)२०२४ मध्येही सरकार स्थापन करेल आणि नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सांगितले. इंडिया टुडेने आयोजित केलेल्या ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये ते बोलत होते.
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर जम्मू-काश्मीर, ईशान्य भाग आणि माओवाद्यांच्या समस्या या तीन महत्त्वाच्या बाबींचा मोठ्या प्रमाणात निपटारा करण्यात आला. पाकिस्तानमध्ये भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतरही कोणत्याही परकीय शक्तीने देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याची हिंमत केली नाही, असे गृहमंत्री अमित शाह यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले, “देशाचे पुढचे पंतप्रधान कोण असेल हे जनता ठरवेल. मी देशातील सर्व भागांचा आणि राज्यांचा दौरा केला आहे. त्यावरून मी सांगू शकतो की, पुढील सरकार भाजप बनवेल आणि मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.
२०२४ च्या निवडणुकीत एनडीएला किती जागा मिळतील, याबद्दल शहा यांना विचारले असता ते म्हणाले की, २०१९ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा नक्कीच त्या जास्त असतील. “आम्हाला (bjp) ३०३ पेक्षा जास्त जागा मिळतील,” असंही ते म्हणालेत. खरं तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपने एकट्याने 303 जागांवर विजय मिळवला होता. तर एनडीएला ५४३ सदस्यांच्या लोकसभेत सुमारे 350 जागा मिळाल्या होत्या.
१९७० नंतर पहिल्यांदाच असे घडणार
अमित शाह म्हणाले की, १९७०नंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. २०१४ मध्ये मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेवर आले, तेव्हा ६० कोटी लोकांकडे बँक खाती नव्हती, १० कोटी लोकांना शौचालये नव्हती आणि तीन कोटी लोकांकडे वीज कनेक्शन नव्हते. मोदी सरकारने या सर्वांना ते मिळवून दिले. बँका, शौचालये, मोफत अन्न, वीज आणि गॅस कनेक्शन, एवढेच नाही तर भारताबाहेरही जगात कुठली समस्या उद्भवल्यास इतर जागतिक नेते मोदींकडे आशेने पाहतात, असेही शहा म्हणाले. करोना साथीचा प्रसार मोदी सरकारने अत्यंत कार्यक्षमतेने हाताळला आणि देशातील सर्व नागरिकांना यशस्वीरीत्या लसवंत केले. जम्मू आणि काश्मीरमधील हिंसाचारात ७० टक्के घट झाली, नक्षलग्रस्त भागात ६० टक्के कमी हिंसाचार झाला आणि अनेक बंडखोरांनी आत्मसमर्पण केले. ईशान्येकडील राज्यांत शांतता करारांवर स्वाक्षरी केली गेली. तसेच मोदी सरकारच्या काळात कलम ३७० रद्द करण्यात आले, राम मंदिर बांधले जात आहे आणि तिहेरी तलाकशी संबंधित समस्यांचे निराकरण केले गेल्याचंही अमित शाह यांनी सांगितलं.