नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने तीन राज्यात तर काँग्रेसने एका राज्यात मोठा विजय प्राप्त केला. मध्य प्रदेशमध्ये भाजपाने प्रचंड बहुमत मिळवून आपली सत्ता राखली. या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. त्यांना केवळ ६६ जागा जिंकता आल्या. २०१८ साली काँग्रेसला १०९ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसच्या पराभवामुळे भाजपाला जितका आनंद झाला. त्यापेक्षा कैकपटीने शिवपुरी विधानसभा मतदारसंघातील एका ज्येष्ठ नागरिकाला आनंद झाला आहे. शिवपुरी विधानसभेत काँग्रेसच्या केपी सिंह कक्काजू यांना भाजपाच्या देवेंद्र कुमार जैन यांनी ४३ हजार मताधिक्याने पराभूत केले. यानंतर ६६ वर्षीय गोविंद सिंह लोधी यांनी तब्बल १५ वर्षांनतर डोक्यावरचे केस भादरले. या आगळ्यावेगळ्या घटनेचे मूळ १५ वर्ष जुने आहे. गोविंद सिंह लोधी यांनी एक शपथ घेतली होती, ती त्यांनी आता पूर्ण केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे वाचा >> भाजपाचा एकहाती विजय; एग्झिट पोलच्या अंदाजापेक्षा मिळवल्या जास्त जागा!

१५ वर्षांपूर्वी कोणती शपथ घेतली होती?

एमपी ब्रेकिंग या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण २००८ चे आहे. संपत्तीशी निगडित एक वाद सोडविण्यासाठी गोविंद सिंह लोधी तत्कालीन आमदार कक्काजू यांच्याकडे गेले होते. मात्र या भेटीत काहीतरी बिनसले आणि कक्काजू यांनी लोधी यांचे निवेदन फाडून टाकले. एवढेच नाही तर त्यांनी लोधींच्या कानशिलातही लगावली आणि हाकलून दिले. त्यादिवशी गोविंद लोधी यांनी शपथ घेतली की, कक्काजू जेव्हा पराभूत होतील, तेव्हा मी मुंडण करेल. गोविंध लोधी यांची ही इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांना १५ वर्षांची वाट पाहावी लागली. तेव्हा कुठे जाऊन ३ डिसेंबर रोजी त्यांना यश आले. यानंतर आनंदीत झालेल्या पिछोर गावातील रहिवासी लोधी यांनी मुंडन केले, दाढी-मिशी काढून टाकली. विशेष म्हणजे केपी सिंह कक्काजू यांच्याही डोक्यावर एकही केस नाही.

केपी सिंह कक्काजू यांचा मोठा पराभव

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार केपी सिंह कक्काजू यांना ६९,२९४ मते मिळाली, तर विजयी उमेदवार भाजपाचे नेते देवेंद्र कुमार जैन यांना १ लाख १२ हजार ३२४ मते मिळाली. तब्बल ४३ हजार मतांनी काँग्रेसच्या आमदाराचा पराभव झाला. काँग्रेसने त्यांना यावेळी पिछोर मतदारसंघाऐवजी शिवपुरी येथून मैदानात उतरविले होते.

हे वाचा >> मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वबदलाच्या हालचाली, मल्लिकार्जुन खर्गे-राहुल गांधींनी कमलनाथ यांना दिलेल्या आदेशांची चर्चा!

यावेळी मध्य प्रदेशच्या निवडणुकीआधी अनेक ठिकाणी अशाप्रकारच्या शपथा आणि पैजा लावल्याचे समोर आले होते. कुणी कमलनाथ यांच्या विजयावर दहा लाखांची पैज लावील. तर कुणी राज्यात काँग्रेसचे सरकार येईल, अशी पैज लावली. तसेच दातिया जिल्ह्यातील काँग्रेस नेता फूल सिंह बरैया यांनी दावा केला होता की, जर भाजपाला ५५ जागा मिळाल्या तर ते तोंड काळं करतील. निकालानंतर भाजपाला १६३ जागा मिळाल्याचे लक्षात येताच फूल सिंह भोपाळ येथे तोंड काळे करण्यासाठी पोहोचले. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी त्यांना रोखले आणि केवळ कपाळाला काळा टिका लावून प्रतिकात्मक पद्धतीने त्यांचा प्रण पूर्ण केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the defeat of congress mla kp singh kakkaju govind singh lodhi got his head shaved had taken the vow 15 years ago kvg