रेल्वे स्थानकानंतर अयोध्येत बांधण्यात आलेल्या श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलण्यात आले आहे. अयोध्या विमानतळाचे ‘महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ असे नामकरण करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ३० डिसेंबर रोजी अयोध्येला भेट देणार असून त्यादरम्यान ते नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत.
याशिवाय अयोध्येच्या पुनर्विकसित रेल्वे स्टेशनचेही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ते नवीन अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. ते इतर अनेक रेल्वे प्रकल्पही राष्ट्राला समर्पित करणार आहेत. दुपारी १२.१५ वाजता पंतप्रधानांच्या हस्ते नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर पंतप्रधान एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. जेथे ते राज्यातील १५,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
अयोध्येत आधुनिक जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे, कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि शहराच्या समृद्ध इतिहास आणि वारशाच्या अनुषंगाने नागरी सुविधा पुरवण्यात येणार असल्याचा भाजपाचा दावा आहे. हे लक्षात घेऊन शहरात नवीन विमानतळ, पुनर्विकसित रेल्वे स्थानक, नवीन रस्ते आणि इतर नागरी पायाभूत सुविधांचे उद्घाटन करण्यात येत आहे. अनेक नवीन प्रकल्पांची पायाभरणी केली जाईल, जे अयोध्या आणि आसपासच्या नागरी सुविधांच्या सुशोभीकरणासाठी आणि सुधारण्यास हातभार लावतील.
हेही वाचा >> प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी, अयोध्या रेल्वे स्थानकाचं नाव बदललं!
अयोध्येची विमानतळाची वैशिष्ट्ये काय?
निवेदनात म्हटले आहे की, अयोध्येतील अत्याधुनिक विमानतळाचा पहिला टप्पा १,४५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ ६५०० चौरस मीटर असेल, जे दरवर्षी सुमारे १० लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज असेल. टर्मिनल इमारतीचा पुढचा भाग अयोध्येतील आगामी श्री राम मंदिराची मंदिर वास्तुकला दर्शवतो. टर्मिनल इमारतीच्या आतील भागात स्थानिक कला, चित्रे आणि भगवान श्री रामाचे जीवन दर्शविणारी भित्तीचित्रे सजलेली आहेत.
अयोध्या विमानतळाची टर्मिनल इमारत विविध सुविधांनी सुसज्ज आहे. इन्सुलेटेड रूफिंग सिस्टीम, एलईडी लाइटिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कारंज्यांसह लँडस्केपिंग, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, सीवेज ट्रीटमेंट प्लांट, सोलर पॉवर प्लांट या सुविधा देण्यात आल्या आहेत.