पीटीआय, ऋषिकेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यात १७ दिवस अडकलेल्या मजुरांच्या सुटकेनंतर त्यांना बुधवारी हेलिकॉप्टरने ऋषिकेश येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे वैद्यकीय तपासण्यांसाठी नेण्यात आले. भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरने सर्व ४१ कामगारांना चिन्यालिसौड येथून ऋषिकेश येथील ‘एम्स’मध्ये आणण्यात आले आहे.

सर्व कामगार निरोगी आहेत परंतु दोन आठवडय़ांहून अधिक काळ बोगद्यात अडकल्यामुळे आरोग्य समस्यांच्या शक्यतेमुळे त्यांना ऋषिकेशच्या ‘एम्स’ येथे आणण्यात आले आहे. ‘एम्स’च्या अधिकाऱ्याने सांगितले की, या कामगारांना प्रथम ‘ट्रॉमा वॉर्ड’मध्ये नेले जाईल. त्यांनी सांगितले की तेथून त्यांना १०० खाटांच्या आपत्ती कक्षात हलवले जाईल जिथे त्यांच्या आरोग्याशी संबंधित सर्व बाबी तपासल्या जातील. ते म्हणाले की, मजुरांच्या आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात सर्व सुविधा आणि डॉक्टर उपलब्ध आहेत. तत्पूर्वी, चिन्यालिसौड रुग्णालयात मजुरांची भेट घेतल्यानंतर आणि त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की, सर्व मजूर बांधव निरोगी आणि आनंदी आहेत. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मदत केली जात आहे. संभाव्य आरोग्य समस्या टाळण्यासाठीच त्यांना ऋषिकेशच्या ‘एम्स’ला रवाना केले आहे.

हेही वाचा >>>१६ व्या वित्त आयोगाच्या स्थापनेला मंजुरी;अध्यक्ष-सदस्यांची नियुक्ती प्रतिक्षेत

सुटका झालेल्या मजुरांना प्रत्येकी एक लाख

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी बोगद्यात अडकलेल्या मजुरांची चिन्यालिसौड रुग्णालयात बुधवारी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांच्या प्रोत्साहनपर रकमेचा धनादेश मुजुरांना सुपूर्द केला. तसेच या बचाव मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात ‘रॅट मायिनग’ खोदकाम तंत्र वापरून ढिगाऱ्यात पाइप टाकण्यासाठी हाताने खोदकाम करणाऱ्या कामगारांना प्रत्येकी ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा केली. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी या मजुरांच्या कुटुंबीयांशीही चर्चा केली. त्यांना खाण्यापिण्याबाबत काही अडचण येत आहे का, अशी विचारणा केली. आता सर्वासह दिवाळी साजरी करू : मुख्यमंत्री

दिवाळीलाच झालेल्या या दुर्घटनेमुळे यावेळी आपण सर्व जण दिवाळी साजरी करू शकलो नाही आणि आता सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर दिवाळी साजरी केली जाईल. धामी यांनी सुटका झालेल्या सर्व मजुरांसह त्यांच्या कुटुंबीयांना डेहराडून येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दिवाळी साजरी करण्यासाठी आमंत्रित केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the rescue of the trapped laborers they were taken to the all india institute of medical sciences aiims in rishikesh for medical examinations amy
Show comments