अत्यंत गुप्ततेने सरकारी यंत्रणांची कार्यवाही, तिहार तुरुंगातच दफनविधी
* ज्या गुप्ततेने भारताने अफझल गुरु यास फाशी दिली त्याचा आम्ही निषेध करतो. – अॅम्नेस्टी इंटरनॅशनल
* काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये २३ पोलिस अधिकाऱ्यांसह ३६ जण जखमी
भारतीय लोकशाहीचे सर्वोच्च पीठ असलेल्या संसदेवर २००१ मध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरू याला शनिवारी सकाळी आठ वाजता तिहार तुरुंगात फाशी देऊन तिथेच त्याचे दफन करण्यात आले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याच्याप्रमाणेच अफजलच्या शिक्षेची कार्यवाही अत्यंत गुप्तपणे अमलात आणण्यात आली. त्याची दयेची याचिका राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सहा दिवसांपूर्वी म्हणजे ३ फेब्रुवारीला फेटाळली होती.
संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दलाचे नऊ जवान धारातीर्थी पडले होते. या हल्ल्याला दहा वर्षे उलटून गेल्यानंतर अफजलला फाशी देण्यात आली आहे. तरी सरकारने उचललेले पाऊल हे स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया प्रमुख राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे.
अफजल गुरू हा ४३ वर्षांचा अतिरेकी उत्तर काश्मीरमधील सोपोर गावचा होता. तो मूळचा फळविक्रेता होता. डिसेंबर २००२ मध्ये अफजल गुरू याला अतिरेक्यांना हल्ल्यात मदत करण्याच्या आरोपावरून दोषी ठरवण्यात आले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑगस्ट २००५ रोजी शिक्कामोर्तब केले होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काश्मीर खोऱ्यात सुरक्षा वाढवली असून, बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जम्मू व काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, पोलीस महासंचालक अशोक प्रसाद व इतर वरिष्ठ अधिकारी तातडीने जम्मू येथून सकाळीच श्रीनगरकडे रवाना झाले. तेथील कायदा-सुव्यवस्था स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
गुरूची दयेची याचिका फेटाळल्याची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना सरकारने दिली होती. स्पीड पोस्टने त्यांना ही माहिती कळवल्याचे केंद्रीय गृह सचिव आर. के. सिंग यांनी सांगितले. हुर्रियतच्या मिरवेझ उमर फारूख यांच्या गटाने चार दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून, या काळात सर्व व्यवहार बंद ठेवले जातील, असे या संघटनेचे प्रवक्ते शहीद उल इस्लाम यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा