संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरू याला फाशी देण्यात आल्यानंतर काश्मीरमध्ये निदर्शने करणाऱयांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या एका निदर्शकाचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. उबेद मुश्ताक असे या निदर्शकाचे नाव आहे.
काश्मीर खोऱयात शनिवारी सकाळपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील वॉटरगाम गावात निदर्शने करणाऱयांवर पोलिसांनी रविवारी गोळीबार केला. त्यामध्ये मुश्ताक हे जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याच घटनेतील आणखी एक जखमी साजद अहमद यांच्या डोक्याला गोळी लागली. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, असेही डॉक्टरांनी सांगितले. अफजल गुरूच्या फाशीनंतर काश्मीर खोऱयात सुरू झालेल्या निदर्शनांमध्ये आतापर्यंत सुमारे ५० जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये २३ पोलिसांचा समावेश आहे.

Story img Loader