महाधिवक्त्यांची लोकसभा सचिवालयाला आदेश जारी करण्याची सूचना
दोषी ठरवण्यात आलेले राजद खासदार लालूप्रसाद यादव व जगदीश शर्मा यांना न्यायालयाच्या निर्णयानंतर आता अपात्र ठरवण्याबाबतचा प्रश्न जवळपास निकालात निघाला असून महाधिवक्ता जी.ई.वहानवटी यांनी लोकसभा सचिवालयास त्यांच्या जागा रिकाम्या करण्याची सूचना करण्यास सांगितले आहे.
वहानवटी यांनी सांगितले की, दोषी ठरलेल्या व शिक्षा झालेले लोकप्रतिनिधी हे अपात्र ठरले आहेत. ज्या दिवशी त्यांना न्यायालयाने दोषी ठरवले त्यादिवसापासून ते अपात्र ठरले आहेत, आता लवकरच त्यांच्या जागा रिकाम्या करणारी अधिसूचना लोकसभा सचिवालय जारी करील.
लोकसभा सचिवालयाने त्यांच्याकडे याबाबत नेमकी प्रक्रिया काय आहे अशी विचारणा केली आहे. राज्यसभा सचिवालयाने खासदार रशीद मासूद यांना एमबीबीएस घोटाळा प्रकरणी चार वर्षे तुरूंगवासाची शिक्षा झाल्याने त्यांची जागा रिकामी झाल्याचे जाहीर करणारी प्रक्रिया सुरू केली आहे.