आगरतळा-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले आहेत. आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास आसाममधील दिमा हासाओ येथील दिबालाँग स्टेशनवर ही घटना घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, या अपघाताच्या कारणांचा शोध घेत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आगरतळा-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस आज सकाळी आगरतळा येथून निघाली होती. ती दुपारी चारच्या सुमारास लुमडिंग-बर्दरपूर हिल भागात पोहोचली. याठिकाणी अचानक या इंजिनसह एक्सप्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.

यासंदर्भात बोलताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास दिबालाँग स्टेशनजवळ आगरतळा-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले. या अपघात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातानंतर लुमडिंग-बदरपूर सिंगल लाईन सेक्शनवरील गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आहे. तसेच अपघात निवारण ट्रेन आणि अपघात निवारण वैद्यकीय गाडी घटनास्थळी दाखल झाले आहेत.