एखादी व्यक्ती किती वर्षे जगेल हे सांगणारी रक्ताची चाचणी संशोधकांनी विकसित केली आहे. वार्धक्याच्या प्रक्रियेचा वेग ठरवून त्याच्या मदतीने हा निष्कर्ष काढला जाणार आहे.
टेलोमीअर या गुणसूत्रांच्या टोकाला असलेल्या सूक्ष्म घटकांची लांबी मोजून एखाद्या व्यक्तीच्या वार्धक्य प्रक्रियेचा वेग ठरवता येतो. जेव्हा पेशींचे विभाजन होते तेव्हा त्यात गुणसूत्रांच्या टोकांशी असलेले टेलोमीअर हे महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात.
टेलोमीअर हे प्रत्येक पेशीविभाजनानंतर आखूड होत जातात. जर तुमच्या रक्तात अशा आखूड टेलोमीअरचे प्रमाण जास्त असेल तर तुमचे आयुष्य हे सरासरी आयुमर्यादेपेक्षाही कमी असते. त्यामुळे रक्ताची चाचणी करून तुम्ही एखादी व्यक्ती किती जगणार ते सांगू शकता.
 ब्रिटनमध्ये सुमारे शंभर व्यक्ती या चाचणीला सामोऱ्या गेल्या असून त्यांना त्यांच्या वार्धक्य प्रक्रियेचा वेग कळला आहे, असे ‘द इंडिपेंडंट’च्या वृत्तात म्हटले आहे.
ज्या कंपनीने ही चाचणी विकसित केली आहे त्यांच्या मते इंग्लंडमध्ये ही चाचणी पुढील वर्षी अनेक लोक करून घेतील. तिच्यासाठी ६५० पौंड इतका खर्च येतो व दशकाअखेरीस लाखो लोक ही चाचणी करण्यास तयार होतील. इन्शुरन्स कंपन्यांसाठी आवश्यक असलेल्या चाचण्यांमध्ये या चाचणीचा समावेश असावा अशी या कंपनीची अपेक्षा आहे.
लाइफ लेन्थ या कंपनीने ही चाचणी तयार केली असून ही कंपनी माद्रिदमध्ये आहे. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन मॅटलिन यांनी सांगितले, की सध्या आपण जशी कोलेस्टेरॉलची चाचणी करतो तशा पद्धतीची नैमित्तिक चाचणी म्हणून तिला मान्यता मिळाली पाहिजे.
काही तज्ज्ञांच्या मते टेलोमीअर चाचणी ही किती महत्त्वपूर्ण आहे किंवा त्यातून किती माहिती मिळते याबाबत साशंकता आहे. एका नोबेल विजेत्याने तर अशा चाचणीतून ९९ टक्के लोकांना काहीच फायदा होणार नाही असे म्हटले आहे.
येत्या पाच वर्षांत टेलोमीअर चाचणीची किंमत वीस टक्क्यांनी कमी करण्याचा या कंपनीचा इरादा असून २०१७ पर्यंत ही किंमत ६५ पौंड इतकी खाली येईल.    
टेलोमीअर चाचणीची वैशिष्टय़े
* आखूड टेलोमीअर जितके जास्त तितके आयुष्य कमी
* सध्याचा खर्च ६५० पौंड
* विकसित करणारी कंपनी लाइफ लेन्थ
* विमा कंपन्याही वापर करण्याची शक्यता

Story img Loader