उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये समाजवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात चुरशीची लढत मानली जात आहे. निवडणूक प्रचारादरम्यान सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात सतत खडाजंगी होत असते. २०१७ च्या निवडणुकीनंतर जेव्हापासून योगींनी युपीचा कार्यभार स्वीकारला तेव्हापासून त्यांचे अखिलेश यादव यांचे वाद सर्वश्रूत आहेत. परंतु एक व्यक्ती अशी आहे जी या दोघांच्याही विरोधात आहे. त्यांचं नाव आहे विजय सिंह.
विजय सिंह माजी शिक्षक आहेत आणि त्यांनी गोरखपूर जागेवरून सीएम योगी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे वचन दिले आहे. विजय सिंह यांनी मैनपुरीच्या करहाल विधानसभा मतदारसंघातून अखिलेश यादव यांच्याविरोधात प्रचार करण्याची घोषणाही केली आहे. म्हणजे विजय सिंह हे आता अखिलेश यादव आणि सीएम योगी या दोघांचेही विरोधक झाले आहेत.
विजय सिंह हे भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ते असून ते गेल्या २६ वर्षांपासून मुझफ्फरनगरमध्ये धरणे आंदोलन करत आहेत. हजारो एकर जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करून बसलेल्या भूमाफियांवर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे. इंडिया टुडेशी बोलताना विजय सिंह म्हणाले, “होय, मी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मी ९ फेब्रुवारीला गोरखपूर सदर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे.” गोरखपूर सदर जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ फेब्रुवारी असून मतदान ३ मार्चला होणार आहे.
विजय सिंह म्हणाले, “मी निवडणूक लढवणार आहे कारण मला लोकांना सांगायचे आहे की जे पक्ष गेल्या २६ वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत राहिले, त्यांनी भ्रष्टाचार आणि भूमाफियांविरुद्ध काहीही केले नाही.” गोरखपूर सदर मतदारसंघातून मुख्यमंत्री योगी यांच्या उमेदवारीनंतर लगेचच विजय सिंह यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “मी सर्वात स्वस्त निवडणूक लढवणार आहे, पाच राज्यांत होत असलेल्या निवडणुकीत इतकी स्वस्त निवडणूक कोणीही लढवत नाही. पॅम्प्लेट वाटून मी जनतेपर्यंत पोहोचेन,” असं त्यांनी सांगितलं.
विजय सिंह यांनी चौधरी चरण सिंग विद्यापीठातून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि भूगोल या विषयात पदवी संपादन केली. यानंतर त्यांनी बी.एड. केले. ते म्हणाले, “९० च्या दशकात मी शाळेत जाताना एका मुलाला रडताना पाहिले, तो त्याच्या आईजवळ पोळी मागत होता, मात्र तिच्याकडे मुलाला देण्यासाठी पोळी नव्हती. मला खूप वाईट वाटले, मी पाहिले की माझ्या गावात हजारो बिघा ग्रामसभेची जमीन पडून आहे, परंतु त्यावर शक्तिशाली राजकारण्यांनी अतिक्रमण केले आहे.”
१९९६ मध्ये विजय सिंह यांनी मुझफ्फरनगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन केले होते. त्यांनी जिल्हा अधिकारी, महसूल न्यायालये आणि अनेक मुख्यमंत्र्यांकडे याचिकाही केल्या. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेव्हा मुख्यमंत्री योगी कैरानामध्ये रॅलीसाठी आले होते तेव्हा विजय सिंह त्यांना भेटायला बसले होते, मात्र त्यांना भेटू देण्यात आले नाही. मात्र, त्याची कागदपत्रे अधिकाऱ्यांनी नक्कीच घेतली. दस्तऐवज घेऊनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा दावा विजय सिंह यांनी केला आहे.
विजय सिंह म्हणाले की, ही जमीन गरीब आणि भूमिहीनांसाठी सरकारी आहे, परंतु भूमाफिया आणि राजकारण्यांच्या संगनमताने गरिबांना त्यांचा हक्क मिळत नाही. अखिलेश यादव यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता विजय सिंह म्हणाले, “नाही, मी अखिलेश यादव यांनाही पाठिंबा देऊ शकत नाही. मुख्यमंत्री असताना त्यांनी भूमाफियांविरोधात काहीही केले नाही. त्याच्या विरोधातही मी प्रचार करणार आहे. गोरखपूरमध्ये जसा प्रचार करेन तसाच मी करहालला जाऊन प्रचार करणार आहे. मी तिथेही पोस्टर वाटेन. माझे काही मित्र आहेत जे मला मदत करतील. माझ्या गरजा खूप कमी आहेत आणि मी देखील एक शेतकरी आहे, माझ्याकडे फक्त थोडीशी जमीन आहे.”
आपल्या कुटुंबाबद्दल विजय सिंह म्हणाले, “मला दोन मुली आहेत, त्या दोघी विवाहित आहेत. एक मुलगा आहे जो पश्चिम उत्तर प्रदेशातील एका साखर कारखान्यात कनिष्ठ अभियंता आहे. माझ्या कुटुंबाचा मला पाठिंबा नाही. माझ्या कुटुंबीयांचा माझ्या आंदोलनाला विरोध आहे. गेल्या २६ वर्षांत काय बदलले या प्रश्नावर विजय सिंह म्हणाले की, या वर्षांत जिल्हा दंडाधिकार्यांच्या मदतीने सुमारे ६०० ते ७०० बिघा जमीन रिकामी करण्यात आली आहे.