जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याच्या अटकेविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाचे लोण गुरुवारी आणखी काही राज्यांमध्ये पोहचले. काही ठिकाणी अभाविपने देशभक्तीपर घोषणा देत याविरुद्ध प्रतिआंदोलन केले. बिहारची राजधानी पाटणा येथे एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या कन्हैया समर्थक आणि विरोधी गटांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.
कन्हैया कुमार याची अटक व त्याच्यावर दिल्लीतील पतियाळा हाऊस परिसरात झालेला हल्ला याविरुद्ध चेन्नईमध्ये ‘मक्कल कलाई इकाकिया कळघम’ या सांस्कृतिक संस्थेच्या पुढाकाराने सात संघटनांनी निषेध मोर्चा काढला. त्यांनी नंगाबक्कम भागातील शास्त्री भवनसमोर निदर्शने सुरू केल्यानंतर १५ मिनिटांतच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. स्थानबद्ध करण्यात आलेल्या ५७ लोकांमध्ये तामीळ लोकगायक कोवन याचाही समावेश होता.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ‘राष्ट्रविरोधी’ शक्तींविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत आणि ‘वंदे मातरम्’च्या उच्चारवाने घोषणा देत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अहमदाबाद, बंगळुरू, मुंबई व कोलकाता या शहरांमध्ये प्रतिआंदोलन केले.
बिहारचा रहिवासी असलेल्या कुमार याच्या अटकेचा निषेध करण्यासाठी भाकपची विद्यार्थी शाखा असलेली एआयएसएफ संघटना व राजदची युवक शाखा यांचे कार्यकर्ते पाटण्यातील भाजप कार्यालयावर चालून गेले. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला, तेव्हा उडालेल्या चकमकीत दोन्ही बाजूंनी दगड आणि पाण्याच्या बाटल्यांचा मारा करण्यात आला.
भाजपने पक्ष कार्यालयापासून मोर्चा काढण्याची परवानगी मागितली होती, परंतु पोलिसांनी ती नाकारली. मात्र लाठय़ा घेऊन आलेल्या एआयएसएफ व राजदच्या कार्यकर्त्यांना मात्र थेट आमच्या कार्यालयापर्यंत पोहचून आमच्यावर हल्ला करण्याची मुभा देण्यात आली, असे पक्षाच्या राज्य शाखेचे उपाध्यक्ष संजय मायुख म्हणाले. एआयएसएफ व राजदचे कार्यकर्ते कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय भाजप कार्यालयावर चालून आल्याचे पोलिसांनीही सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा