पीटीआय, नवी दिल्ली, सिकंदराबाद, लखनौ, पाटणा, भोपाळ, चंडीगड : संरक्षण दलातील अग्निपथ भरती योजनेविरोधातील उद्रेकाचे लोण शुक्रवारी देशाच्या दक्षिण भागातही पसरले. तेलंगणमध्ये सिकंदराबाद येथे पोलिसांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात एक ठार झाला. उत्तरेतील राज्यांत उत्फूर्तपणे सुरू झालेल्या आंदोलनाची तीव्रता शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशीही कायम होती.

अनेक राज्यांच्या विविध भागांत शुक्रवारीही तरुणांनी अग्निपथविरोधात हिंसक निदर्शने केली. त्यातही उत्तरेतील भाजपशासित राज्यांमध्ये आंदोलनाचा आगडोंब उसळला होता. संतप्त तरुणांनी रेल्वेगाडय़ा, बसगाडय़ा, स्थानके, खासगी वाहने आदींची जाळपोळ केली.  बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा आणि तेलंगणमध्ये तरुणांच्या गटांनी रेल्वेगाडय़ांना आग लावली. दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचीही मोठय़ा प्रमाणावर तोडफोड केली. अनेक राज्यांत रास्ता रोको आणि रेल्वे रोको करण्यात आले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवापर्यंत सुमारे २००हून अधिक रेल्वे गाडय़ा रद्द कराव्या लागल्या.

भाजपशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणासह बिहार, झारखंड आणि दिल्लीत बुधवारी आंदोलनाचा भडका उडताच सरकारने गुरुवारी या प्रक्रियेअंतर्गत भरतीची कमाल वयोमर्यादा २०२२ साठी २१ वर्षांवरून २३ वर्षे केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी अग्निपथ भरती योजनेची वयोमर्यादा वाढवल्याची माहिती देत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट, शुक्रवारी आंदोलनाचा वणवा दक्षिणेत आणि इशान्येकडे आसाममध्येही पोहोचला. 

तेलंगणमध्ये सिकंदराबाद येथे सुमारे ३५० जणांच्या जमावाने रेल्वेगाडीच्या पार्सल डब्याला आग लावली. सिकंदराबाद रेल्वेस्थानकाची तोडफोड करणाऱ्या निदर्शकांना पांगवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक ठार झाला. दक्षिण मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हा गोळीबार रेल्वे संरक्षण दलाने केल्याचे स्पष्ट केले.

उत्तर भारतात दगडफेक, तोडफोड, वाहने पेटवण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर घडले. बिहारमध्ये दोन, उत्तर प्रदेश आणि तेलंगणमधील प्रत्येकी एक अशा चार रेल्वेगाडय़ा पेटवण्यात आल्या. भरतीसाठी इच्छुक तरुणांनी बिहारमधील लखीसराय येथे नवी दिल्ली-भागलपूर ‘विक्रमशीला एक्स्प्रेस’ आणि समस्तीपूर येथे नवी दिल्ली-दरभंगा ‘बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेस’च्या डब्यांना आग लावली. लखीसराय स्थानकावर, निदर्शकांनी रेल्वे मार्गावर ठिय्या दिला.

उत्तर प्रदेशातील बलिया येथे तरुणांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘अग्निपथ परत घ्या’ अशा घोषणा देत रिकाम्या रेल्वेगाडीला आग लावली आणि अन्य काही रेल्वेगाडय़ांची तोडफोड केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये तसेच फिरोजाबाद, अमेठी येथेही तरुणांनी निदर्शने केली. नोएडा येथे जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये लक्ष्मीबाई नगर रेल्वे स्थानकाजवळ शेकडो आंदोलक जमले आणि त्यांनी दगडफेक केली. सुमारे १५ आंदोलकांना अटक करण्यात आली. सुमारे ६०० तरुण गटा-गटाने आले आणि त्यांनी रेल्वेमार्ग अडवला, अशी माहिती इंदूरच्या पोलीस आयुक्तांनी दिली. हरयाणातही निदर्शक तरुणांनी जाळपोळ केली. रस्त्यावर टायर जाळण्यात आले. काही तरुणांनी नरवाना येथे रेल्वे रुळांवर ठिय्या दिला आणि जिंद-भटिंडा रेल्वेमार्ग रोखला. पलवलमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनानंतर, हरियाणा सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून फरिदाबाद जिल्ह्यातील वल्लभगढ भागात मोबाइल-इंटरनेट आणि एसएमएस सेवा २४ तासांसाठी बंद केली.

राजधानी दिल्लीत तुलनेने शांतता होती. परंतु ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या निषेधामुळे मेट्रोच्या सेवेवर परिणाम झाला. काही मेट्रो स्थानके बंद करावी लागली.

अमित शहा म्हणाले..

संरक्षण दलांत भरतीसाठी अग्निपथ योजनेंतर्गत कमाल वयोमर्यादा वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयाचा फायदा बहुसंख्य तरुणांना होईल. करोनामुळे गेल्या दोन वर्षांत सैन्यातील भरती प्रक्रिया खंडित झाली होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांच्या हिताचा संवेदनशील निर्णय घेतला आहे.

लष्करप्रमुख म्हणाले..

अग्निपथ योजनेंतर्गत २०२२ साठी भरतीची कमाल वयोमर्यादा २३ वर्षे करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे ज्या युवकांनी दोन वर्षांपासून संरक्षण दलांत भरतीची तयारी केली, परंतु करोना साथीमुळे ते भरती होऊ शकले नाहीत, अशांना संधी मिळेल.

दोन दिवसांत भरती प्रक्रिया

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेची औपचारिक भरती प्रक्रिया येत्या दोन दिवसांत सुरू करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. भरती झालेल्या उमेदवारांना डिसेंबपर्यंत प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य लष्कराने निश्चित केले आहे. तर हवाई दलात भरती करण्यासाठी २४ जूनपासून निवड प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी शुक्रवारी दिली.

लोकांना काय हवे आहे, तेच मोदींना समजत नाही : राहुल

अग्निपथ योजना तरुणांनी नाकारली, कृषी कायदा शेतकऱ्यांनी नाकारला, नोटाबंदी निर्णय अर्थतज्ज्ञांनी नाकारला, जीएसटी तरतूद व्यापाऱ्यांनी नाकारली. देशातील लोकांना नेमके काय हवे आहे, ते पंतप्रधानांना समजत नाही. कारण त्यांना त्यांच्या ‘मित्रां’च्या आवाजाशिवाय काहीही ऐकू येत नाही, अशी टीका काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी केली.

२०० रेल्वे गाडय़ा रद्द

अग्निपथ योजनेविरोधात बुधवारपासून उफाळलेल्या उद्रेकाचा फटका ३०० हून अधिक रेल्वेगाडय़ांना बसला, तर २००हून अधिक गाडय़ा रद्द कराव्या लागल्या. त्यात ९४ मेल-एक्स्प्रेस आणि १४० प्रवासी गाडय़ांचा समावेश असल्याचे रेल्वेने सांगितले. निदर्शकांनी सात रेल्वेगाडय़ांना आग लावल्याने त्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.

भाजप नेते, कार्यालये लक्ष्य

बिहारमध्ये पाटणा येथे भाजपनेत्या उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या घरावर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार डॉ. संजय जैस्वाल यांच्या घरासह कार्यालयांवरही आंदोलकांनी हल्ला केला. तर माधेपुरा येथील भाजपच्या कार्यालयाला निदर्शकांनी आग लावली. 

Story img Loader