तरुणांना भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी जाहीर करण्यात आलेली ‘अग्निपथ’ योजना लष्करावर ताबा मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) छुपा अजेंडा असल्याचा गंभीर आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी केला आहे. लष्करात भरती झाल्यानंतर आणि सेवा संपल्यानंतरही अग्निवीर आरएसएस कार्यकर्ते असतील असंही ते म्हणाले आहेत. कुमारस्वामी यांच्या या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आरएसएस नेते त्यांची नियुक्ती करणार आहेत की लष्कर? आता १० लाख लोकांची भरती केली जाणार असून यामधील आरएसएस कार्यकर्त्यांना कदाचित लष्करात नेमलं जाईल. अडीच लाख कार्यकर्त्यांना कदाचित लष्करात भरती केलं जाईल आणि ७५ टक्के तरुणांना ११ लाख रुपये देऊन बाहेर पाठवणे हा छुपा अजेंडा आहे. त्यांना देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं जाईल,” असा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “आतमध्ये आणि बाहेर असणारे आसएसएसचे हे लोक लष्करावर ताबा मिळवण्याची योजना आखत आहेत”. कुमारस्वामी यांनी आरएसएसचं अग्निपथ असा उल्लेख करताना जर्मनीत हिटरलची नाझी राजवट असताना आरएसएसची स्थापना झाल्याची आठवण करुन दिली.

“कदाचित त्यांना (आरएसएस) देशात नाझी राजवट अंमलात आणायची आहे. यासाठी त्यांनी अग्निपथ योजना आणली आहे. यासंबंधी अनेक चर्चेचे मुद्दे आहेत. माझ्या मनात या योजनेसंबंधी अनेक शंका आहेत,” असं कुमारस्वामी यावेळी म्हणाले.

“अग्निपथमधून २.५ लाख तरुणांना सेवेत घेतलं जाईल ते आरएसएस कार्यकर्ते असतील. हा आरएसएसचा छुपा अजेंडा आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर ज्या ७५ टक्के तरुणांना बाहेर पाठवण्यात येईल ते देशभरात पसरतील. जर तेदेखील आरएसएसचे असतील तर मग हा लष्करावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे,” असं कुमारस्वामी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agnipath scheme ex karnataka cm kumaraswamy rss agniveers army nazi movement sgy