केंद्र सरकारने अल्पकालीन सैन्यभरतीसाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात देशभरात आंदोलन सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तिन्ही सैन्यदल प्रमुखांची भेट घेणार आहे. उद्या म्हणजेच २१ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांना भेटणार आहेत. अग्निपथ योजनेला होणार विरोध आणि त्यानंतर सैन्यदल प्रमुखांनी त्यावर जाहीर केलेली भूमिका या पार्श्वभूमीवर सर्वांच लक्ष या बैठकीकडे असेल.
इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तिन्ही प्रमुख स्वतंत्रपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. सर्वात प्रथम नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार पंतप्रधानांची भेट घेतील.
हिंसक आंदोलकांना ‘अग्निपथ’ची दारे बंद ; भरती प्रक्रियेबाबत तिन्ही दलांची घोषणा, वेळापत्रकही जाहीर
दरम्यान अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार ठाम असताना लष्कराच्या तिन्ही सेवांनी रविवारी अग्निवीरांच्या भरतीचा व्यापक कार्यक्रम जाहीर केला. त्याचबरोबर, ‘अग्निपथ’ विरोधातील जाळपोळ आणि तोडफोडीत सामील झालेल्या तरुणांना या योजनेची दारे बंद असतील, असा इशाराही दिला.
वेळापत्रक असे..
नौदल
२५ जूनपर्यंत भरतीची मार्गदर्शक तत्त्वे, पहिल्या तुकडीचा प्रशिक्षण कार्यक्रम २१ नोव्हेंबपर्यंत, महिला आणि पुरुष अशा दोघांचीही भरती.
हवाई दल
नोंदणी प्रक्रिया २४ जूनपासून, भरतीच्या पहिल्या टप्प्यासाठी ऑनलाइन परीक्षा २४ जुलैपासून, ३० डिसेंबपर्यंत पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण.
भूदल
२० जूनला अधिसूचनेचा मसुदा सादर, १ जुलैपासून विविध अधिसूचना, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये देशभरात ठिकठिकाणी एकूण ८३ भरती मेळावे, २५ हजार जवानांच्या पहिल्या तुकडीला डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवडय़ात प्रशिक्षण.
मोदींचं अप्रत्यक्ष भाष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी दिल्लीतली प्रगती मैदानमध्ये टनलचं उद्घाटन केलं. यापूर्वी मोदींनी टनलची पहाणी केली. यावेळी मोदींनी दिलेल्या भाषणामध्ये प्रगती मैदानाचं महत्व सांगितलं. “अनेक दशकांपूर्वी भारताची प्रगती, सामर्थ्य, वस्तू आणि संस्कृती दाखवण्याच्या उद्देशाने या मैदानाची निर्मिती करण्यात आला. मात्र प्रगती मैदानाची प्रगती फार आधीच थांबली होती. याची योजना केवळ कागदावर होती. प्रत्यक्षात काहीही झालं नाही,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. याचसंदर्भात पुढे बोलताना त्यांनी अग्निवीरच्या पार्श्वभूमीवर सुरु असणाऱ्या हिंचाचारासंदर्भात अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. “हा आजचा नवा भारत आहे. हा भारत समाधान शोधतो. नव्या कामांसाठी इथे फार संकटांना तोंड द्यावं लागतं,” असंही म्हटलं.