लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत असताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला होता. अग्निवीर योजना आणून सरकारने लष्करालाही धोक्यात आणले असल्याचे सांगून शहीद अग्निवीरांच्या कुटुंबियांना कोणतेही लाभ दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर आता लष्कराकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. शहीद अग्निवीर अजय कुमार याच्या कुटुंबियांना आतापर्यंत ९८ लाखांचा मोबदला दिला असल्याचे लष्कराच्या वतीने सांगण्यात आले आहे.
लोकसभेत भाषण केल्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्यांनी शहीद अजय कुमार सिंह यांच्या कुटुंबियांशी बातचीत केल्याचा व्हिडीओही शेअर केला. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भगवान शिव यांच्या फोटोसमोर देशाला खोटे सांगतिले, असाही आरोप केला. यानंतर लष्कराच्या वतीनेही एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकून सविस्तर भूमिका सांगितली गेली आहे.
“कर्तव्य बजावत असताना अग्निवीर अजय कुमार सिंह हे शहीद झाले. त्यांना योग्य मोबदला दिला नसल्याचा आरोप काही जणांनी सोशल मीडियावर केल्याचे आमच्या निदर्शनास आले. लष्कराच्या वतीने अजय कुमार सिंह यांच्या कुटुंबियांना एकूण ९८.३९ लाखांचा मोबदला दिला गेला आहे”, अशी पोस्ट लष्कराच्या वतीने टाकली गेली आहे.
याच पोस्टमध्ये पुढे म्हटले की, अग्निवीर योजनेच्या तरतुदींनुसार ६७ लाखांचे अनुदान आणि इतर फायदे, पोलीस पडताळणीनंतर लवकरच दिले जाईल. यामुळे अजय सिंह यांच्या कुटुंबियांना अंदाजे १.६५ कोटी रुपयांचा मोबदला मिळेल. तसेच लष्कराने असेही सांगितले की, लष्करात सेवा बजावताना शहीद होणारे सैनिक किंवा अग्निवीर यांच्या कुटुंबियांना तात्काळ मोबादला देण्याची भूमिका लष्कराकडून घेतली जाते.
राहुल गांधी यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर लगेचच लष्कराने आपली भूमिका मांडली. राहुल गांधी यांच्या व्हिडीओमध्ये अजय कुमार सिंह यांचे वडील कोणताही मोबदला मिळाला नसल्याचे सांगत आहेत. तसेच लोकसभेत बोलत असताना राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकारने अग्रिवीरांना वापरून फेकून देण्याचे काम केले आहे. सरकारने मृत अग्निवीरांना शहिदाचा दर्जाही दिला नाही.
राहुल गांधी यांच्या आरोपानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत त्यांच्या भाषणादरम्यानच हा दावा खोटा असल्याचे म्हटले होते. विरोधी पक्षनेत्यांनी सभागृह आणि देशाची फसवणूक करू नये, असेही ते म्हणाले होते.
© IE Online Media Services (P) Ltd