आग्रा येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जमिनीच्या वादातून चार जणांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण करत त्याला जमिनीत पुरलं. मात्र भटक्या कुत्र्यांनी जमीन उकरून त्याचा चावा घेतल्यामुळे त्याला शूद्ध आली आणि तो तिथून बाहेर पडला, असा दावा एका व्यक्तीने केला आहे. रुप किशोर असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. त्याने दावा केला की, १८ जुलै रोजी आग्रा येथील अरतोनी परिसरात अंकित, गौरव, करण आणि आकाश या चार जणांनी त्याला जबर मारहाण केली. मारहण झाल्यानंतर बेशूद्ध पडल्यामुळे आपण मृत्यूमुखी पडल्याचे समजून या चार जणांनी तेथील जमिनीत मला पुरले, असाही दावा रुप किशोर याने केला.
रुप किशोरने पुढे सांगितले की, त्याला ज्याठिकाणी पुरले होते. तिथे भटक्या कुत्र्यांनी जमीन उकरून मांस खाण्याच्या उद्देशाने त्याचा चावा घेतला, ज्यामुळे त्याला शूद्ध आली आणि तो तिथून बाहेर पडला. खड्ड्यातून बाहेर पडून तो गावात फरफटत येत असताना स्थानिकांनी त्याला ओळखले आणि रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
रुप किशोरच्या आईने दिलेल्या जबाबानुसार चारही आरोपींनी तिच्या मुलाला घरातून बळजबरीने बोलावून नेले होते. त्यानंतर त्याला जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या शेतातच त्याला पुरले.
या प्रकरणी सिकंदर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नीरज शर्मा यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, आम्ही चारही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे.