उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे एक विचित्र घटना घडली आहे. येथे कंत्राटी मजूर म्हणून काम करणाऱ्या एका आरोपीने आपल्या मोठ्या बहिणीचा निर्घृण खून केला. बहिणीचा १९ वर्षीय मुलगा आपल्या पत्नीबरोबर (३४ वर्षीय) पळून गेल्याच्या रागातून आरोपीने बहिणीची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी सिंह (३८) याने मोठी बहीण गीता देवी सिंह (४५) यांची हत्या करून एका प्लास्टिकच्या पिशव्यात मृतदेह गुंडाळला आणि तेहडी बगिया येथील परिसरात निर्जन स्थळी फेकून दिला.
खून केल्यानंतर आरोपी रवी सिंह आपल्या १२ वर्षांच्या मुलाला घेऊन दिल्लीला पळाला होता. पण पोलिसांनी दिल्लीत त्याला अटक करून आग्रा येथे आणले. पण आरोपीची पत्नी आणि भाचा यांचा अद्याप शोध लागलेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेहडी बगिया येथील स्थानिकांना एका पिशवीतून मानवी पाय बाहेर आलेले दिसले. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. स्थानिक महिलेने पोलिसांना सांगितले की, रवी सिंहने ही पिशवी रविवारी रात्री येथे फेकली होती. यानंतर पोलिसांनी रवी सिंहच्या घरी धडक दिली. मात्र त्याचे घर बंद असल्याचे दिसले. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता घरात रक्ताचे डाग, फुटलेल्या बांगड्या आणि रक्ताने माखलेला चाकू आढळून आला.
रवी सिंहच्या मोबाइलचे लोकेशन तपासून त्याला दिल्लीतून ताब्यात घेतले आहे, अशी माहिती ट्रान्स यमुना पोलीस ठाण्याचे प्रमुख भानू प्रताप सिंह यांनी दिली.
भानू प्रताप सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे, रवी सिंहची पत्नी रोषनी ही रवीचा १९ वर्षीय भाचा भुराच्या प्रेमात होती. भुराही याच परिसरात राहण्यास होता. शेजाऱ्यांनी सांगितले की, मामा घरात नसताना भुरा अनेकदा त्यांच्या घरी येत असे. भुरा आणि मामी हे १६ फेब्रुवारी रोजी पळून गेले होते. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना हरियाणातून शोधून आणले होते. २४ फेब्रुवारी रोजी भुराला आग्र्यात आणले गेले. पण पत्नीने पतीबरोबर राहायचे नसल्याचे सांगून येण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा एकदा भुरा आणि रोशनी पळून गेले. त्यामुळे संतापलेल्या मामाने स्वतःच्याच बहिणीला संपवले.
बहीण गीता देवी यांचे पती प्रताप सिंह यांनी पोलिसांना सांगितले की, रविवारी सायंकाळी माझी पत्नी भावाच्या घरी गेली होती. पण तिथून ती परतलीच नाही. त्यामुळे सकाळी आम्ही पोलिसांना फोन करून ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली.