जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सामना करताना कॅप्टन शुभम गुप्ता शहीद झाले. या घटनेची बातमी कळताच शुभम गुप्ता यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कारण शुभम गुप्ता यांच्या लग्नाची तयारी त्यांच्या घरी सुरु होती. मात्र याच घरावर शोककळा पसरली. मुलगा घरी येईल आणि त्याचं लग्न होईल ही वाट पाहणारे त्यांचे कुटुंबीय आता त्यांच्या पार्थिवाची वाट बघत आहेत.

शुभम गुप्ता शहीद झाल्याची बातमी आली आणि त्यांचे कुटुंबीय खूप दुःखी झाले. शुभमच्या आईची शुद्ध हरपली. त्यांचे वडील वसंत गुप्ता म्हणाले मी जेव्हा जेव्हा शुभमला लष्कराच्या गणवेशात बघायचो तेव्हा मला अभिमान वाटायचा. तो घरी आला की आम्ही त्याचं लग्न करणार होतो असं माध्यमांना सांगितलं आहे. आग्र्याचे भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री एस. पी. बघेल यांनी शुभम गुप्ता यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.

शहीद कॅप्टन शुभम गुप्ता यांचा भाऊ ऋषभ म्हणाला की शुभम जेव्हा गुप्त मोहिमेवर जात असे तेव्हा त्याचा फोन बंद असायचा. देशावर दादा (शुभम गुप्ता) खूप प्रेम करायचा. सुरुवातीपासूनच शुभमला देशासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून लष्करात जायचं होतं. लष्कराचा गणवेश लहानपणापासून त्याला आवडयाचा हे सांगताना भाऊ ऋषभलाही अश्रू अनावर झाले.

काय घडली घटना?

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या दोन कॅप्टनसह अन्य दोन जवान शहीद झाले. चकमकीत एका मेजरसह अन्य एक जवान जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.बाजीमालच्या जंगलात रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती. जंगलालगतच्या गावातील रहिवाशांना घरातच थांबण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे शाळाही बंद ठेवण्यात आल्याचे एका रहिवाशाने सांगितले. जे दोन कॅप्टन शहीद झाले त्यातील एक शुभम गुप्ता होते.

Story img Loader