पीटीआय, नवी दिल्ली
भारत आणि कतारदरम्यानचा द्विपक्षीय व्यापार पुढील पाच वर्षांमध्ये दुप्पट करून २८ अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य मंगळवारी निर्धारित करण्यात आले. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सामरिक भागीदारीच्या स्तरापर्यंत उंचावत असल्याचेही जाहीर करण्यात आले.
कतारचे अमिर शेख तमिम बिन हमाद अल-थानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा झाली. त्यावेळी दोन्ही नेत्यांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि सामान्य जनतेचा आपापसातील संपर्क यावर लक्ष केंद्रित करून द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला.
भारत आणि कतारदरम्यान मंगळवारी दोन करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. एक करार सामरिक भागीदारी करण्याविषयी आहे आणि दुसरा सुधारित दुहेरी कर टाळण्याचा करार आहे. त्याशिवाय आर्थिक भागीदारी मजबूत करणे, अभिलेखागारांचे व्यवस्थापन आणि युवा व्यवहार व क्रीडा प्रकारांमध्ये सहकार्य याविषयी पाच सामंजस्य करारही करण्यात आले.
भारत व कतारदरम्यानचा सध्याचा द्विपक्षीय व्यापार १४ अब्ज डॉलर इतका असून तो पुढील पाच वर्षांमध्ये २८ अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य पंतप्रधान मोदी आणि कतारचे अमिर यांनी निश्चित केल्याचे चॅटर्जी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या वर्षीच्या कतार भेटीत भारताने कतारमधून पुढील २० वर्षे एलएनजी आयात करण्याचा ७८ अब्ज डॉलरचा करार केला होता.
सामरिक भागीदारी करारामुळे दोन्ही देशांदरम्यानचे सध्याचे द्विपक्षीय संबंध सामरिक स्तरापर्यंत उंचावणार आहेत. व्यापार, ऊर्जा सुरक्षा तसेच प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सहकार्य अधिक दृढ करण्यावर आमचा भर आहे. – अरुण कुमार चॅटर्जी, सचिव, परराष्ट्र मंत्रालय
‘एफटीए’साठी वाटाघाटी
भविष्यामध्ये द्विपक्षीय मुक्त व्यापार करार (एफटीए) करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि कतारचे अमिर यांच्यादरम्यान चर्चा झाली अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या भारत आणि आखात सहकार्य परिषदेदरम्यान (जीसीसी) ‘एफटीए’साठी वाटाघाटी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘जीसीसी’मध्ये संयुक्त अरब अमिराती, बहारिन, सौदी अरेबिया, ओमान, कतार आणि कुवैत या देशांचा समावेश आहे. भारत व कतारही ‘एफटीए’ची शक्यता पडताळून पाहत आहेत.