Agustin Escobar Siemens Spain CEO: गुरुवारी अमेरिकेतील न्यू यॉर्कमधील हडसन नदीवर एक हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात सीमेन्स कंपनीचे स्पेनमधील अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी मर्स कॅम्परुबी मोंटल, त्यांची तीन मुले आणि हेलिकॉप्टर पायलट यांचा मृत्यू झाला आहे.
शैक्षणिक आणि औद्योगिक कारकिर्द
ऑगस्टिन एस्कोबार हे सीमेन्स कंपनीचे स्पेनमधील अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ते सीमेन्स मोबिलिटी साउथवेस्ट युरोपचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील होते. त्यांनी माद्रिदमधील युनिव्हर्सिडॅड पोंटिफिशिया कोमिलास येथून इंडस्ट्रीयल इंजीनिअरींगची पदवी प्राप्त केली होती. त्यांना ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक क्षेत्रात २५ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे.
२०१४ ते २०१८ पर्यंत, त्यांनी लॅटिन अमेरिकेतील ऊर्जा व्यवस्थापन विभाग आणि पायाभूत सुविधांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी उत्तर अमेरिकेतील सीमेन्ससाठी स्ट्रॅटेजी आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय विकासाचे कॉर्पोरेट संचालक म्हणून काम पाहिले होते. १९९८ ते २०१० पर्यंत त्यांनी स्पेनमध्ये विविध भूमिका बजावल्या.
उड्डाणानंतर सुमारे १८ मिनिटांनी हेलिकॉप्टर कोसळले
एस्कोबार आणि त्यांचे कुटुंब नुकतेच बार्सिलोनाहून न्यू यॉर्कला सुट्टीसाठी आले होते. उड्डाणानंतर काही वेळातच, त्यांचे हेलिकॉप्टर मॅनहॅटनमधील पियर ४० जवळ हडसन नदीत कोसळले. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हे हेलिकॉप्टर ‘न्यू यॉर्क हेलिकॉप्टर’ कंपनीचे होते.
गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरने न्यू यॉर्कच्या डाउनटाउन भागातून उड्डाण केले. रडार डेटानुसार, त्याने मॅनहॅटनच्या बाजूने उत्तरेकडे उड्डाण केले आणि नंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीकडे वळले. उड्डाणानंतर सुमारे १८ मिनिटांनी ते कोसळले.
प्रत्यक्षदर्षी काय म्हणाले?
अपघाताच्या व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरचे काही भाग हवेत तुटू लागले हे स्पष्ट दिसत होते. अपघातातील प्रत्यक्षदर्शींच्या मते, हेलिकॉप्टरचा मागचा भाग आणि पंख वेगळे झाले होते. एका महिलेने सांगितले की तिने हवेत गोळीबार झाल्यासारखे आवाज ऐकले आणि नंतर हेलिकॉप्टर अनेक तुकडे नदीत पडताना पाहिले. दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, हेलिकॉप्टरमधून धूर येत होता आणि ते गिरक्या घेत खाली पडले. दरम्यान या अपघाताची माहिती समजल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट करत दुख: व्यक्त केले आहे.