Rahul Gandhi on Wrestler Protest : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाचे आज (२८ मे) उद्घाटन केले. या उद्घाटनाचा कार्यक्रम भव्यदिव्य करण्यात आला. तसंच, या नव्या संसद भवनाच्या निमित्ताने आपण भारताच्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत असल्याचं संबोधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. एकीकडे देशाच्या सर्वोच्च अशा संसद भवनाचं उद्घाटन होत असताना दुसरीकडे मात्र, स्वचःच्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करण्याऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नव्या संसद भवनाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनियासह अनेक कुस्तीपटूंची पोलिसांनी धरपकड केली आहे. ही धरपकड होत असातना कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचेही समोर आले आहे. या सर्व प्रकरणाचे देशाच्या राजकारणातही आता पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहंकारी राजा संबोधून सडकून टीका केली आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. पण, ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणी करत कुस्तीपटू २३ एप्रिलपासून जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर कुस्तीपटूंनी जंतर-मंतर ते नवे संसद भवन अशा मार्चचं आयोजन केलं होतं. त्यानुसार कुस्तीपटू ११.३० मिनिटांनी नव्या संसद भवनाकडे निघाले होते. पण, त्यापूर्वीच पोलिसांनी कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह अन्य काही जणांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट झाल्याच समोर आलं आहे.
हेही वाचा >> VIDEO: मोठा राडा, पोलिसांनी बळाचा वापर करून फोगाट बहिणींना घेतलं ताब्यात, जंतर-मंतरवरील कुस्तीपटूंचे तंबूही हटवले
कुस्तीपटू साक्षी मलिकने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात पोलीस बळाचा वापर संगीता फोगाट आणि विनेश फोगाट हिला गाडीत बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. तिच्या हातात भारतीय ध्वज तिंरगाही दिसत आहे. ट्विटवर साक्षी मलिकने लिहलं की, “आपल्या खेळाडूंना अशी वागणूक दिली जात असून, जग सगळं पाहत आहे.”
हाच व्हिडीओ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट केला आहे. “:राज्याभिषेक पूर्ण झाला. अहंकारी राजा रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे”, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं.
नव्या संसद भवनाचे उद्घाटन होताच राहुल गांधी यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यात त्यांनी हे नव्या संसदेचे उद्घाटन नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्याभिषेक असल्याचं वाटत आहे, असं गांधी म्हणालेत.
“रक्त आणि घाम आटवून देशासाठी मेडल आणणं आमचा गुन्हा होता का? जर हो असेल तर आम्हाला फाशी द्या”, अशी संतप्त प्रतिक्रिया साक्षी मलिक यांनी ट्विटद्वारे केली आहे.
दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणी करत कुस्तीपटू २३ एप्रिलपासून जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. ब्रिजभुषणला अटक होत नाही, त्यांच्यावर कारवाई होत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका कुस्तीपटूंनी घेतली आहे. त्यातच, आज झालेल्या झटापटीनंतर या आंदोलनाला अधिक धार येण्याची शक्यता आहे.