राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६४ टक्के मतांसह विजय मिळवलेल्या द्रौपदी मुर्मू या आज, देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. संसदेत सकाळी १०.१५ वाजता हा शपथविधी सोहळा होईल. या सोहळ्यासाठी मुर्मू या पारंपारिक संथाली साडी नेसणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. (येथे क्लिक करुन जाणून घ्या या सोहळ्याचे सर्व अपडेट्स)
मुर्मू यांच्या वहिनी सुकरी तुडू या भारताच्या पूर्वेकडे वास्तव्यास असणाऱ्या संथाली महिला जी साडी नेसतात तशीच एक साडी घेऊन दिल्लीत दाखल झाल्या आहेत. मूर्म यांच्या शपथविधी सोहळ्याला सुकरी यांच्यासोबत त्यांचे पती तारिनीसेन तुडू सुद्धा उपस्थिती असणार आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमधील या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तुडू दांपत्य शनिवारीच दिल्लीला रावाना झालं.
“मी दीदीसाठी पारंपारिक संथाली साडी घेऊन जात आहे. त्यांनी ही शपथविधीच्या वेळी नेसावी असं मी त्यांना सांगणार आहे. अशा प्रसंगी कपड्यासंदर्भातील काय नियम आहेत मला ठाऊक नाही. राष्ट्रपती भवनाकडून नव्या राष्ट्रपतींच्या कपड्यांबद्दल काही निर्धेश असल्यास मला कल्पना नाही,” असं सुकरी यांनी सांगितलं.
संथाली साड्यांवर एका बाजूला पट्ट्यांप्रमाणे दिसणारं नक्षीकाम असतं. एखाद्या विशेष समारंभाला संथाली महिला या साड्या वापरतात. या साडीची घडी केली तर दोन्ही बाजू अगदी हुबेहुब सारख्याच असतात. या नक्षीकामामधून सुरेख आकृतीबंध तयार केला जातो.
सुकरी या त्यांचे पती आणि नातेवाईकांसहीत मयुरभंज जिल्ह्यामधील रायरंगपूर येथील उपरभेडा गावात वास्तव्यास आहेत. पारंपारिक गोड पदार्थही आपण मुर्मू यांच्यासाहीठ घेऊन जात असल्याचं सुकरी यांनी सांगितली. अरिसा पीठा असं या पदार्थनाचं नावं आहे. मुर्मू यांच्या कन्या इतश्री ही बँक अधिकारी आहे. इतश्री या त्यांच्या पती गणेश हेम्बराम यांच्यासहीत नवी दिल्लीमध्ये दाखल झाल्या असून त्या त्यांच्या आईसोबत वास्तव्यास आहेत.
“मुर्मू यांच्या कुटुंबातील चारजण शपथविधी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. भाऊ, वहिनी, मुलगी आणि जावई,” अशी माहिती भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने दिली आहे.
सरन्यायाधीश एन. व्ही. रमण हे मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ देतील. त्यानंतर राष्ट्रपती म्हणून त्या देशाला उद्देशून पहिले भाषण करतील. या सोहळय़ाला मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री, खासदार आदी उपस्थित राहतील.