Man From Gujarat Learned To Make Bombs Online For Revenge : अहमदाबादमध्ये नुकतेच एका पार्सलचा स्फोट झाला होता. यामध्ये दोन लोक गंभीर जखमी झाले होते. आता या प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. यामध्ये मुख्य आरोपी रुपेन राव याचाही समावेश आहे. या प्रकरणातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल झाले आहेत.
रुपेन राव इंटरनेटवरून बॉम्ब आणि देशी पिस्तुलांची निर्मिती शिकला होता. रुपेनच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला असून, याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या घटस्फोटासाठी रुपेनने पत्नीचा मित्र सुखदेव शुखाडिया, मेहुणा आणि सासरे यांना जबाबदार धरले असून, त्याला त्यांना धडा शिकवायचा होता.
बॉम्ब निर्मितीचे साहित्य जप्त
यावेळी पोलिसांनी आरोपीकडून आणखी दोन बॉम्ब, देशी पिस्तूल, गोळ्या आणि बॉम्ब निर्मितीसाठी असलेले साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून, याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
पार्सलचा स्फोट
दरम्यान शनिवारी साबरमती परिसरातील रो हाऊसमध्ये हा स्फोट झाला होता. ज्यामध्ये दोन लोक गंभीर जखमी झाले होते. पोलीस उपायुक्त भारत राठोड यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “सुखाडिया यांच्या घरी एक पार्सल पाठवण्यात आले होते. त्या पार्सलचा स्फोट झाला. त्यानंतर घटनास्थळावरच आम्ही गौरव गंधवी या आरोपीला अटक केले. तर रुपेन राव आणि २१ वर्षीय रोहन रावल यांना रात्री अटक करण्यात आले.”
बदला घेण्यासाठी बॉम्ब निर्मिती
मुख्य आरोपी रुपेन रावने, तो बॉम्ब निर्मिती इंटरनेटवरून शिकल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्याच्या पत्नीचे बलदेव सुखाडिया यांच्याशी अफेअर असल्याची शंका होती, त्यामुळे आरोपी बलदेव सुखाडिया यांना धडा शिकवण्यासाठी इंटरनेटवरून बॉम्बची निर्मिती शिकला. यामध्ये रोहनने पैसे मिळवण्यासाठी रुपेनला मदत केली. तर गौरवने पीडिताच्या घरी बॉम्बचे पार्सल डिलिव्हर केले होते. रुपेन राव गेल्या तीन ते चार महिन्यांपासून इंटरनेटवरून बॉम्ब कसा तयार करायचा हे शिकत होता. आरोपीला त्याच्या घटस्फोटासाठी जबाबदार असलेल्या लोकांना धडा शिकवायचा होता.