पुणे : देशात वाढत्या व्याजदरांमुळे घरे परवडत नसल्याचे चित्र आहे. यातच आता घरे परवडणाऱ्या शहरांमध्ये अहमदाबादने पहिले स्थान पटकाविले आहे. देशातील प्रमुख आठ महानगरांमध्ये अहमदाबाद अग्रस्थानी असून त्यानंतर कोलकता आणि पुण्याचा संयुक्तपणे दुसरा क्रमांक लागला आहे. या शहरांमध्ये उत्पन्नाच्या तुलनेत गृहकर्जाच्या मासिक हप्तय़ाचे प्रमाण कमी आहे.
मालमत्ता क्षेत्रातील नाइट फ्रँक संस्थेने याबाबतचा चालू वर्षांतील पहिल्या सहामाहीचा अहवाल बुधवारी जाहीर केला. त्यात सर्वसाधारण घरातील उत्पन्नाशी कर्जाच्या मासिक हप्तय़ाचे गुणोत्तर तपासण्यात आले. हे गुणोत्तर म्हणजे उत्पन्नापैकी किती पैसे मासिक हप्तय़ासाठी जातात हे दर्शविते. देशातील प्रमुख आठ महानगरांमध्ये हे गुणोत्तर २०१० ते २०२१ या कालावधीत घसरल्याचे दिसून आले. करोना संकटाच्या काळात रिझव्र्ह बँकेने व्याजदरात कपात करून व्याजदर दशकातील नीचांकी पातळीवर आणले होते. त्यामुळे हे गुणोत्तर घसरले होते. त्यानंतर वाढत्या महागाईमुळे रिझव्र्ह बँकेने व्याजदरात अडीच टक्क्यांची वाढ केली आहे. तेव्हापासून देशात घरांचे परवडणे कमी झाले आहे. यंदा जानेवारी ते जून या कालावधीत देशातील प्रमुख आठ महानगरांमध्ये अहमदाबादमध्ये घरातील उत्पन्नाशी कर्जाच्या मासिक हप्तय़ाचे गुणोत्तर सर्वात कमी होते.
कौटुंबिक उत्पन्नाच्या तुलनेत मासिक हप्ता
अहमदाबाद : २३
पुणे : २६
कोलकता : २६
बंगळुरू : २८
चेन्नई : २८
दिल्ली : ३०
हैदराबाद : ३१
मुंबई : ५५ (टक्क्यांमध्ये)