Ahmedabad-Mumbai Double Decker Express : गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वे अपघाताच्या घटना वाढल्या असल्याचं दिसून येत आहे. आज अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या डबल डेकर एक्स्प्रेसचे काही डबे अचानक वेगळे झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र, ही घटना घडल्यानंतर जवळपास तीन ते चार तास गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

आज सकाळी अहमदाबादवरून मुंबईला जाणाऱ्या डबल डेकर एक्स्प्रेसचे काही डबे सुरत जवळ अचानक वेगळे झाले. एक्स्प्रेसचे डबे इंजिनपासून अचानक वेगळे झाल्यामुळे प्रवासी घाबरले. आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर रेल्वे इंजिन आणि वेगळे झालेले डबे थांबण्यात आले. त्यानंतर प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले. या घटनेमुळे काहीवेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

हेही वाचा : Digital Arrest scam: ‘डिजिटल अटक’ करत उत्तर प्रदेशच्या प्रतिष्ठित महिला डॉक्टरची २.८ कोटींची फसवणूक; सहा दिवस घरातच कैद

या घटनेनंतर तातडीने रेल्वे कर्मचारी आणि रेल्वेचे आधिकारी तसेच स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर ही ट्रेन दुरुस्त करण्यात आली. मात्र, दोन ते तीन तासांपेक्षा जास्त वेळ शेकडो प्रवाशांचे हाल झाले. अहमदाबादवरून मुंबईला जाणाऱ्या या डबल डेकर एक्सप्रेसचं कपलिंग तुटल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, कपलिंग तुटल्यानंतर पुन्हा वेगळे झालेले डब्बे जोडण्यात आले. यानंतर एक्सप्रेस पुन्हा मुंबईकडे रवाना करण्यात आली.

याआधी बिहारमध्येही घडली होती घटना

बिहारमधील समस्तीपुर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. दिल्लीला जाणारी बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेस अचानक दोन भागात विभागली गेली होती. रेल्वेचे डबे इंजिनपासून वेगळे झाले होते. बिहार क्रांती एक्स्प्रेस ही गाडी दरभंगा ते नवी दिल्ली असा प्रवास करत होती. मात्र, समस्तीपूर-मुझफ्फरपूर रेल्वे विभागातील खुदविराम बोस पुसा रेल्वे स्थानकाजवळ अचानक बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेसचे डबे इंजिनपासून वेगळे झाले होते. त्या घटनेतही कोणतीही जीवितहानी हानी झाली नव्हती. मात्र, घटनेनंतर बराचवेळ रेल्वे मार्गावर खोळंबा झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ahmedabad mumbai double decker express coaches suddenly separated marathi news indian railway gkt