गेल्या दीड दशकाहून श्रीमंत-गरीब- प्रगत-अप्रगत असा कसलाही भेदभाव न करणारा एड्स नावाचा राक्षसी आजार रोगग्रस्तांचे शरीर व तो न झालेल्यांचे मन भीतीने पोखरून काढत होता. मात्र आता या आजाराचा राक्षस मानवी संशोधनापुढे निष्प्रभ ठरला आहे. ऑस्ट्रेलियातील संशोधकांना एड्सच्या विषाणूमधील विशिष्ट प्रकारच्या प्रथिनात बदल करण्यात यश आले आहे. त्याआधारे या दुर्धर आजाराला प्रतिबंध करण्यात यशस्वी ठरल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. यावरील अधिक चाचण्या फलदायी ठरल्यास एड्सग्रस्त रुग्णांना जीवदानच मिळेल, अशी आशाही या संशोधकांनी व्यक्त केली आहे.
क्वीन्सलॅण्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल रिसर्चमधील संशोधक डेव्हिड हॅरिच यांनी यावर संशोधन केले आहे. एड्सच्या विषाणूमधील विशिष्ट प्रकारच्या अशा या प्रथिनात बदल करता येऊ शकतो. तसे केल्यास एड्सचा प्रतिकार करणे रुग्णाला शक्य होते व या जीवघेण्या आजारामुळे होणारा संसर्गही टाळता येऊ शकतो, असे त्यांनी यावरील आपल्या संशोधनात म्हटले आहे.
हा आगीशी खेळण्याचाच एक प्रकार असल्याचे सांगून ते म्हणाले की, आम्ही वाढीसाठी उद्युक्त असलेल्या एड्सच्या विषाणूमधील सामान्य प्रथिन बदलले. यामुळे विषाणूपासून होणारा प्रसार रोखला गेला, असे ते म्हणाले. विषाणूमधील प्रथिनाच्या बदलामुळे एड्स बरा होतो असे नाही, मात्र त्याच्या प्रसाराला निश्चितपणे आळा बसतो व चांगल्या पेशींचेही रक्षण होते, असे आढळून आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे ‘एबीसी’ न्यूजने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियात एकंदर ३० हजार लोक एचआयव्हीग्रस्त आहेत. आपण केलेले संशोधन परिपूर्ण आहे, असा हॅरिच यांनी दावा केलेला नाही. त्यात काही त्रुटीही असू शकतात. यावरील आणखी चाचण्या यशस्वी झाल्यास एड्सबाधितांच्या उपचारपद्धतीत आमूलाग्र बदल होऊ शकतो. मात्र आतापर्यंत केलेल्या अभ्यासातील निष्कर्ष हे हुरूप वाढवणारेच आहेत, हेही त्यांनी नमूद केले आहे.
काय आहे संशोधन ?
एड्सच्या विषाणूमधील विशिष्ट प्रकारच्या अशा या प्रथिनात बदल करता येऊ शकतो. तसे केल्यास एड्सचा प्रतिकार करणे रुग्णाला शक्य होते व या जीवघेण्या आजारामुळे होणारा संसर्गही टाळता येऊ शकतो.
एड्सवर आता नियंत्रण शक्य!
गेल्या दीड दशकाहून श्रीमंत-गरीब- प्रगत-अप्रगत असा कसलाही भेदभाव न करणारा एड्स नावाचा राक्षसी आजार रोगग्रस्तांचे शरीर व तो न झालेल्यांचे मन भीतीने पोखरून काढत होता. मात्र आता या आजाराचा राक्षस मानवी संशोधनापुढे निष्प्रभ ठरला आहे.
First published on: 18-01-2013 at 02:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aids cure possible