करोनाच्या B.1.1.529 या नव्या विषाणूमुळे (New corona variant) जगभरात काळजी करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात संसर्गाचं कारण ठरलेल्या या विषाणूने जगातील इतर देशांमध्येही पाय पसरण्यास सुरुवात केलीय. आता भारतातील महत्त्वाची वैद्यकीय संस्था असलेल्या एम्सने गंभीर इशारा दिला आहे.
एम्समधील कम्युनिटी मेडिकल सेंटरचे डॉ. संजय राय यांनी शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) या विषाणूबाबत काळजी व्यक्त केली. ते म्हणाले, “या विषाणूच्या संसर्ग क्षमतेविषयी पूर्ण माहिती नसली तरी त्यात मोठ्या प्रमाणात बदल झालेत. त्यामुळे करोना लसीमुळे किंवा नैसर्गिक पद्धतीने शरीरात तयार झालेली करोना विरोधी रोगप्रतिकारक शक्तीलाही हा नवा विषाणू भेदू शकतो.”
नव्या विषाणूने रोगप्रतिकारक शक्तीला भेदल्यास गंभीर धोका
करोनाच्या नव्या विषाणूने मानवी शरीरातील करोना विरोधी रोगप्रतिकारक शक्तीलाही भेदल्यास त्याचा गंभीर धोका तयार होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय.
करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू निर्बंध कमी झाल्यानं देशभरात सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे गर्दी वाढली आहे. याशिवाय भारताने १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळेच या करोनाच्या नव्या विषाणूचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आंतरराष्ट्रीय विमान सेवेबाबत काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा : सावधान, करोनाचा नवा व्हेरिएंट हातपाय पसरतोय; दक्षिण आफ्रिकेनंतर आता इस्त्रायलमध्येही शिरकाव!
दरम्यान, करोनाचा नवा व्हेरिएंट जगभरात हातपाय पसरतो आहे. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोटस्वानानंतर आता करोनाचा B.1.1529 हा व्हेरिएंट इस्राईलपर्यंत पोहचला आहे. इस्राईलच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात संसर्गाला कारणीभूत ठरलेला अधिक धोकादायक करोना व्हेरिएंट इस्राईलमध्ये सापडला आहे. इस्राईलमध्ये नव्या विषाणूचा संसर्ग झालेला रूग्ण मलावीमधून परतला होता.
इस्राईलमध्ये मलावीशिवाय इतर देशांमधून परतलेल्या अन्य २ प्रवाशांमध्ये देखील या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग आढळला आहे. त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
इस्त्रायलमध्ये लसीकरण झाल्यानंतरही करोनाची लागण
विशेष म्हणजे इस्राईलमध्ये संसर्ग झालेले तीनही रूग्णांचं लसीकरण झालेलं होतं. यानंतरही नव्या करोना व्हेरिएंटचा संसर्ग झालाय. त्यामुळे या व्हेरिएंटने इस्राईलसह जगभरातील आरोग्य यंत्रणेची काळजी वाढवलीय. असं असलं तरी इस्राईलमधील या संसर्गित रूग्णांचे लसीकरणाचे किती डोस झाले होते याची स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत अनेक पटीने घातक विषाणू
याआधी जगभरात धोकादायक समजल्या गेलेल्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अनेक पटीने हा नवा व्हेरिएंट घातक असल्याचं समोर येतंय. डेल्टा व्हेरिएंटमध्ये दोन म्युटेशन झाले होते. मात्र, या व्हेरिएंटमध्ये तब्बल १० म्युटेशन झालेले आहे. त्यामुळे याची संसर्ग क्षमता वाढली आहे.
दक्षिण आफ्रिकेत सापडला करोनाचा डेल्टापेक्षाही भयानक व्हेरिएंट
दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही भयानक असल्याने आता जगभरातच चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे आता भारताला आणि भारतीयांनाही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.