करोनाचं प्रमाण कमी झाल्यानंतर महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, एकीकडे निर्बंध शिथिल होत असताना दुसरीकडे म्युकरमायकोसिसनंतर करोनाचा नवा व्हेरिएंट डेल्टा प्लसचे रुग्ण महाराष्ट्रात आढळून आल्यानंतर त्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यासोबतच देशभरात देखील डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर एम्स (AIIMS) अर्थात देशभरातील डॉक्टरांच्या शिखर संस्थेतील बायोकेमिस्ट्रीचे प्राध्यापक डॉ. सुभ्रदीप करमरकर यांनी Delta Plus प्रकाराविषयी एएनआयशी बोलताना माहिती दिली आहे. भारतात अजूनही डेल्टा प्लसची रुग्णसंख्या कमी असून हा विषाणूचा प्रकार चिंतेचं कारण ठरलेला नाही, असं ते म्हणाले आहेत.
राज्यात Delta Plus चे २१ रुग्ण
महाराष्ट्राचा विचार करता आत्तापर्यंत २१ रुग्णांमध्ये करोनाचा डेल्टा प्लस विषाणू आढळून आला आहे. यापैकी ९ रुग्ण रत्नागिरीचे, जळगावचे ७, मुंबईचे २ तर पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाण्यातील प्रत्येकी एक रुग्ण आहे देशभरात देखील अनेक ठिकाणी डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला आहे.
दरम्यान, यासंदर्भात एम्सचे प्राध्यापक सुभ्रदीप करमरकर यांनी डेल्टा प्लसची रुग्णसंख्या कमी असली, तरी त्याचे परिणाम काय असतील, याबद्दल आपल्याला माहिती नाही, असं म्हटलं आहे. “करोनाचा प्रत्येक व्हेरिएंट वेगवेगळ्या प्रकारचे वैद्यकीय परिणाम किंवा प्रतिक्रिया घेऊन आला आहे. याआधीच्या व्हेरिएंटमुळे रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र, डेल्टा प्लसमुळे कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया उमटेल किंवा आरोग्यविषयक परिणाम होतील, त्याबद्दल आपल्याला माहिती नाही”, असं ते म्हणाले.
Every variant comes with a different kind of clinical response. In the previous variant, the oxygen level was dropping but we don’t know what kind of consequences Delta plus variant will come with: Dr Subhradip Karmakar, Associate Professor, Department of Biochemistry, AIIMS pic.twitter.com/l38jvRVKHw
— ANI (@ANI) June 22, 2021
K417N… Delta Plus चा गुणधर्म!
दरम्यान, यावेळी त्यांनी डेल्टा ते डेल्टा प्लस यामधला मूलभूत गुणधर्म देखील सांगितला. “डेल्टा प्लसमध्ये एक अतिरिक्त K417N हा म्युटंट आहे. हा म्युटंट डेल्टाचं (B.1.617.2) रुपांतर डेल्टा प्लसमध्ये करतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे की डेल्टा प्लस हा अल्फा व्हेरिएंटपेक्षा ३५ ते ६० टक्के जास्त संसर्गजन्य आहे. त्यात वेगाने संसर्ग होण्याची क्षमता असू शकते”, असं सुभ्रदीप करमरकर म्हणाले.
भारतात अजून रुग्णसंख्या कमी!
डेल्टा प्लस व्हेरिएंटबद्दल बोलताना डॉ. करमरकर यांनी एक दिलासादायक बाब देखील सांगितली. “भारतात डेल्टा प्लसची रुग्णसंख्या अजूनही कमी आहे. हा व्हेरिएंट अजूनही Variant of Interest असून तो Varient of Concern झालेला नाही”, असं ते म्हणाले.
But in India, the numbers are still very low. It is still a variant of interest & not a variant of concern yet, as the number of infected people is low: Dr Subhradip Karmakar, Associate Professor, Department of Biochemistry, AIIMS#COVID19
— ANI (@ANI) June 22, 2021
महाराष्ट्रात या व्हेरिएंटचा शोध घेण्यासाठी जिनोमिक सिक्वेन्सिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील १०० नमुने घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी ‘सीएसआयआर’ आणि ‘आयजीआयबी’ या महत्त्वाच्या संस्थांचा सहभाग यामध्ये घेतला आहे. ‘एनसीडीसी’चे देखील सहकार्य घेण्यात आहे. १५ मे पासून ७५०० नमुने घेण्यात आले आणि त्यांचे ‘स्क्विन्सिंग’ करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण याबाबत माहिती घेऊन त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात आहे.