राजधानी दिल्लीतील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ अर्थात AIIMSचा सर्व्हर मागील सहा दिवसांपासून ठप्प झाला आहे. AIIMSचा सर्व्हर हॅकर्सने हॅक केल्याची माहिती ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. हॅकर्सने AIIMS प्रशासनाकडे जवळपास २०० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. ही रक्कम क्रिप्टोकरन्सीच्या (आभासी चलन) स्वरुपात द्यावी, असंही हॅकर्सने म्हटलं आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे.

‘मनी कन्ट्रोल’ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या बुधवारपासून AIIMSचा सर्व्हर डाऊन आहे. सर्व्हर हॅक झाल्याने ३ ते ४ कोटी रुग्णांचा तपशील धोक्यात आला आहे. सध्या रुग्णालयातील आपत्कालीन रुग्ण, ओपीडी, प्रयोगशाळा आणि इतर कामकाज पेन आणि कागदाच्या साह्याने केलं जात आहे. या घटनेची माहिती तपास यंत्रणांना देण्यात आली असून पुढील कार्यवाही केली जात आहे.

हेही वाचा- विद्यार्थ्याला दहशतवादी म्हटल्याचा VIDEO व्हायरल; प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई

रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, तपास यंत्रणांच्या शिफारशीनुसार रुग्णालयातील सर्व संगणकांवरील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. एम्सच्या सर्व्हरमध्ये अनेक माजी पंतप्रधान, मंत्री, न्यायाधीश आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक व्हीआयपी रुग्णांचा डेटा आहे. “हॅकर्सनी क्रिप्टोकरन्सीच्या स्वरुपात २०० कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती आहे,” पीटीआयने सूत्राच्या हवाल्याने दिली आहे.

हेही वाचा- पीक विम्याची रक्कम तुटपुंजी; रविकांत तुपकरांनी गाठले कृषी अधीक्षक कार्यालय, अन् मग…

दरम्यान, एनआयसीने ई-हॉस्पिटल्सचा डेटाबेस आणि अॅप्लिकेशन सर्व्हरवर पुन्हा नियंत्रण मिळवलं आहे. तसेच एनआयसीचे पथक एम्समधील इतर ई-हॉस्पिटल सर्व्हरवरून व्हायरस स्कॅन करून ते डिलिट करण्याचं काम करत आहेत. आतापर्यंत चार सर्व्हर स्कॅन केले असून डेटाबेसवर नियंत्रण मिळवलं आहे. पण एम्सच्या सर्व्हरवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी किमान पाच दिवसांचा कालावधी लागू शकतो, असंही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.