Attack on Asaduddin Owaisi: ‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर गोळीबार करत हल्ला करण्यात आला आहे. उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी अज्ञान व्यक्तींनी हल्ला केल्याचे ओवेसी यांनी सांगितलं. या हल्ल्यात कुणीही जखमी झालेलं नाही. हापूर पोलिसांची विविध पथके याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून गेल्या अनेक काळापासून ते हल्ल्याची तयारी करत होते असं वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिन आणि शुभम अशी या हल्लेखोरांची नावं असून ओवेसी यांच्या भाषणांमुळे त्यांच्यात चिड निर्माण झाली होती. तसंच ओवेसींवर हल्ला करण्यासाठी गेल्या अनेक काळापासून ते तयारी करत होते. याचसाठी ते ओवेसींच्या प्रत्येक सभेला हजेरी लावत होते. गुरुवारी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे झालेल्या सभेतही हे दोघे उपस्थित होते. पोलीस आता या सभेचं सीसीटीव्ही तपासणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून ओवेसींचा पाठलाग करत होते, पण त्यांना हल्ल्याची संधी मिळत नव्हती. जेव्हा ओवेसी मेरठमधून दिल्लीला परतत होते तेव्हा त्यांची गाडी टोलनाक्यावर थांबली होती. हीच संधी लक्षात घेता आरोपींनी वाहनावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर ओवेसींची कार पंक्चर झाली आणि त्यानंतर ते दुसऱ्या वाहनाने रवाना झाले.

आरोपींची चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वैचारिकदृष्ट्या कट्टरपंथी आणि विक्षिप्त स्वभावाचे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन याने पोलिसांना आपण ओवेसी बंधूंच्या भाषणावरुन प्रचंड संतापलो होतो. त्यांनी आमच्या श्रद्धेला ठेस पोहोचवली असल्याचं दोन्ही आरोपींचं म्हणणं आहे.

सचिनने काही दिवसांपूर्वी एक गावठी पिस्तूल विकत घेतलं होतं. पोलीस हे शस्त्र पुरवणाऱ्याची माहिती घेत आहेत. ओवेसींवर गोळीबार केल्यानंतर दोन्ही आरोपी गर्दी टाळण्यासाठी पोलीस स्थानकात जाणार होते अशी सूत्रांची माहिती आहे.

ओवेसींची स्वतंत्र चौकशीची मागणी

असदुद्दीन ओवेसी यांनी या घटनेची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. “यामागे कोण आहे? कोणाचं डोकं आहे? आणि हल्ल्याचं कारण काय? या गोष्टी समोर येणं गरजेचं आहे. आम्ही राज्य सरकार आणि मोदी सरकारकडे याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करत आहोत. टोलनाक्यावर खासदारावर गोळीबार होणं कसं काय शक्य आहे?,” असं ओवेसी म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aimim chief asaduddin owaisi car attack two arrested rallies speeches meerut up sgy
Show comments