नागपूरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘विजयादशमी’ सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील धार्मिक असंतुलनावर भाष्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी समाचार घेतला आहे. “मुस्लीम लोकांची लोकसंख्या वाढत नसून कमी होत आहे. तुम्ही त्याचा उगाच तणाव घेऊ नका. कुटुंब नियोजन सर्वात जास्त मुस्लीम लोक करत आहेत.
सर्वात जास्त कंडोम मुस्लीम समाज वापरत आहे. यावर मोहन भागवत बोलणार नाहीत” असे प्रत्युत्तर ओवैसी यांनी दिले आहे.
Dasara 2022: धार्मिक असंतुलन नजरेआड करून चालणार नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
भाजपा नेत्यांच्या वडिलांनी किती अपत्यांना जन्म दिला? असा खोचक सवालही त्यांनी एका सभेत केला आहे. मुस्लिमांच्या लोकसंख्येवर तपशीलानुसार बोलायला हवं, असा सल्ला ओवैसी यांनी भागवतांना दिला. देशात धर्माच्या आधारावर निर्माण होणारे लोकसंख्येचे असंतुलन यापुढे नजरेआड करून चालणार नाही, असे मोहन भागवतांनी दसऱ्याच्या विजयादशमी सोहळ्यात म्हटले होते. एखाद्या देशात लोकसंख्येचा असमतोल तयार होतो, तेव्हा त्या देशाच्या भौगोलिक सीमादेखील बदलून जातात, असा इशारा भागवत यांनी दिला होता. देशात लोकसंख्या धोरण तयार व्हायला पाहिजे. ते सर्वांसाठी समान पद्धतीने लागू व्हावे, अशी मागणी मोहन भागवत यांनी केली होती.
“चीनने लोकसंख्या नियंत्रण धोरण बदलून लोकसंख्यावाढीचे धोरण स्वीकारले आहे. आपल्या देशातील लोकसंख्येचादेखील देशहिताच्या दृष्टीने विचार करता येणे शक्य आहे. आज भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. ५० वर्षांनंतर आजचा युवक वर्ग ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत दाखल होईल, तेव्हा त्यांचा सांभाळ करण्यासाठी किती तरुणांची गरज असेल याचाही विचार आपल्याला आज करावा लागेल”, असा सल्ला भागवत यांनी दिला होता.