एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी गुजरात दंगलीवरील माहितीपटावर बंदी घालण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसवरही निशाणा साधला. “काँग्रेसचे नेते २६ जानेवारीला गांधींची हत्या झाली असं म्हणतात”, असा असुदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं. तसेच ‘क्या बात हैं प्यारे’ असं म्हणत काँग्रेस नेत्यांना टोला लगावला. एमआयएमने एका सभेतील ओवैसींच्या भाषणाचा एक व्हिडीओ ट्वीट केला. यात त्यांनी हे मत व्यक्त केलं.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “आता मला मोदी आणि भाजपाला प्रश्न विचारायचा आहे की, गुजरात दंगलीवरील मोदींच्या मुलाखतीवर बंदी घातली, आता महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेबाबत मोदींचं मत काय आहे ते त्यांनी सांगावं. नथुराम गोडसे गांधींचा हत्यारा आहे. त्याने ३० जानेवारीला गांधींना गोळ्या झाडून हत्या केली. आता हा दिवसही येतो आहे. काँग्रेसचे नेते म्हणाले २६ जानेवारीला गांधींची हत्या केली. ‘क्या बात हैं प्यारे’. ते म्हणाले की, मी कुठंतरी वाचलं, तर ठीक आहे वाचलं असेल.”
“मोदी आणि भाजपा गोडसे मुर्दाबाद म्हणणार की नाही?”
“गोडसेने ३० जानेवारीला गांधींची हत्या केली. मग भारतातला सर्वात पहिला दहशतवादी कोण आहे? स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी नथुराम गोडसे आहे. मग मोदी आणि भाजपा गोडसे मुर्दाबाद म्हणणार की नाही? आता गोडसेवर चित्रपट बनत आहेत. त्यामुळे आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेवरील चित्रपटावर बंदी घालणार की नाही?” असा थेट सवाल ओवैसी यांनी मोदी आणि भाजपाला विचारला.
“गांधींची हत्या करणाऱ्याच्या चित्रपटावर भारतात बंदी घालणार का?”
ओवैसी पुढे म्हणाले, “मोदी नथुराम गोडसेवरील चित्रपटावर बंदी घालणार की जनतेला जाऊन चित्रपट पाहण्यास सांगणार आहेत? त्या चित्रपटात गोडसेने गांधींना का मारलं असं सांगितलं जात आहे. मोदी आणि भाजपाला त्यांच्याविषयी बीबीसीने काही दाखवलं तर मिर्च्या झोंबल्या. मग आता गांधींची हत्या करणाऱ्याचा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार की बंदी घालणार का?”
हेही वाचा : नथुराम गोडसेवरील चित्रपटावरही बंदी घालणार का? ओवैसींचा मोदी सरकारला सवाल
“नरेंद्र मोदी महात्मा गांधींपेक्षा मोठे नाहीत”
“नरेंद्र मोदी महात्मा गांधींपेक्षा मोठे नाहीत. गांधी-आंबेडकरांपेक्षा कोणीही मोठा होऊ शकत नाही. गांधींना मारणाऱ्यावर चित्रपट तयार होत आहे, तर त्यावर मोदी आणि भाजपाने बंदी घालावी,” अशी मागणी ओवैसी यांनी केली.