‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर गोळीबार करत हल्ला करण्यात आला. उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी अज्ञान व्यक्तींनी ओवेसींवर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात कुणीही जखमी झालं नाही. याप्रकरणी सचिन आणि शुभम अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक काळापासून ते हल्ल्याची तयारी करत होते असं वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान हल्ल्यानंतर ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला असून, माझी सुरक्षा सरकराची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. “१९९४ मध्ये मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत मी कोणतीही सुरक्षा घेतली नाही. मला हे आवडतही नाही. माझी सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. मी भविष्यातही सुरक्षा घेणार नाही. जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी जाईन”.

ओवेसी यांनी यावेळी हल्ल्यामागे कोणीतरी मास्टरमाइंड असून निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रयागराजमधील धर्मसंसदेत माझा जीव घेण्यासंबंधी वक्तव्य करण्यात आलं होतं, तेदेखील ऑन रेकॉर्ड असून त्याचीही दखल घ्यावी असं ते म्हणालेत.

Attack on Owaisi: ओवेसींवरील हल्ल्याचं कारण आलं समोर; गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर गाठणार होते पोलीस स्टेशन

हल्ल्यासंबंधी सांगताना ते म्हणाले की, “लाल आणि सफेद रंगाच्या जॅकेटमध्ये दोन हल्लेखोर होते. लाल जॅकेट घातलेल्या हल्लेखोराच्या पायावर गाडीचा टायर गेला तर सफेद जॅकेट घातलेल्या गल्लेखोराने दोन्ही फॉर्च्यूनर गाड्यांवर पुन्हा गोळीबार केला”. यावेळी त्यांनी आपल्याकडे एक परवाना पिस्तूल असून गोळीबाराच्या आवाजावरुन ती नाइन एमएम पिस्तूल किंवा इतर दुसरं होतं असं म्हटलं. भारतात अशाप्रकारे हल्लेखोरांना मिळालेली सूट गंभीर बाब असल्याचंही ते म्हणाले.

ओवेसी म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान, उत्तर प्रदेश प्रशासनाने या प्रकरणाकडे पाहिलं पाहिजे. तसंच निवडणूक आयोग याची दखल घेत याची चौकशी करेल अशी आशा आहे. मी हे प्रकरण कोर्टात घेऊन जाणार आहे. संधी मिळाली तर शुक्रवारी लोकसभा अध्यक्षांचीही भेट घेईन. आज चार वेळा एका खासदारावर गोळी चालवण्यात आली, उद्या कोणावरही होईल. मी उत्तर प्रदेशात नेहमी प्रचारासाठी येणार. प्रसिद्धी मिळण्यासाठी हे केलं जात असल्याचं काहीजण म्हणत आहे. पण असं अजिबात नसून याची चौकशी झाली पाहिजे. यामागे कोण मास्टरमाइंड आहे ज्याला माझा आणि लोकशाहीचा आवाज ऐकायचा नाही?”.

काय आहे प्रकरण?

दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सचिन आणि शुभम अशी या हल्लेखोरांची नावं असून ओवेसी यांच्या भाषणांमुळे त्यांच्यात चिड निर्माण झाली होती. तसंच ओवेसींवर हल्ला करण्यासाठी गेल्या अनेक काळापासून ते तयारी करत होते. याचसाठी ते ओवेसींच्या प्रत्येक सभेला हजेरी लावत होते. गुरुवारी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे झालेल्या सभेतही हे दोघे उपस्थित होते. पोलीस आता या सभेचं सीसीटीव्ही तपासणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून ओवेसींचा पाठलाग करत होते, पण त्यांना हल्ल्याची संधी मिळत नव्हती. जेव्हा ओवेसी मेरठमधून दिल्लीला परतत होते तेव्हा त्यांची गाडी टोलनाक्यावर थांबली होती. हीच संधी लक्षात घेता आरोपींनी वाहनावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर ओवेसींची कार पंक्चर झाली आणि त्यानंतर ते दुसऱ्या वाहनाने रवाना झाले.

गोळीबारानंतर हल्लेखोर गाठणार होते पोलीस स्टेशन

आरोपींची चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वैचारिकदृष्ट्या कट्टरपंथी आणि विक्षिप्त स्वभावाचे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन याने पोलिसांना आपण ओवेसी बंधूंच्या भाषणावरुन प्रचंड संतापलो होतो. त्यांनी आमच्या श्रद्धेला ठेस पोहोचवली असल्याचं दोन्ही आरोपींचं म्हणणं आहे.

सचिनने काही दिवसांपूर्वी एक गावठी पिस्तूल विकत घेतलं होतं. पोलीस हे शस्त्र पुरवणाऱ्याची माहिती घेत आहेत. ओवेसींवर गोळीबार केल्यानंतर दोन्ही आरोपी गर्दी टाळण्यासाठी पोलीस स्थानकात जाणार होते अशी सूत्रांची माहिती आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aimim chief asaduddin owaisi denied security after firing on car sgy
Show comments