उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपा, समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेसनं आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मायावतींच्या बहुजन समाज पार्टीनं आपल्या पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी माफियांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मायावतींनी मुख्तार अन्सारी यांना उमेदवारी देणार नसल्याचं जाहीर केलं आहे. यानंतर आता ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षानं अन्सारी यांना खुली ऑफर दिली अहे. त्यांना पक्षाची दारं खुली आहेत, असं एआयएमआयएमकडून सांगण्यात आलं आहे.
“मुख्तार अन्सारी उत्तर प्रदेशच्या ज्या जागेवरून लढू इच्छितात. तेथून ते पार्टीचं तिकीट घेऊ शकतात”, असं एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आज तकशी बोलताना सांगितलं आहे. ओवैशी मिशन उत्तर प्रदेशासाठी रणनिती आखत आहेत. या रणनिती अंतर्गत या महिन्याच्या २२, २५, २६ आणि ३० तारखेला उत्तर प्रदेश दौऱ्यावर असणार आहेत. २२ सप्टेंबरला संभल, २५ सप्टेंबरला प्रयागराज, २६ सप्टेंबरला कानपूर आणि ३० ऑक्टोबरला बहरायच दौरा करणार आहेत.
1. बीएसपी का अगामी यूपी विधानसभा आमचुनाव में प्रयास होगा कि किसी भी बाहुबली व माफिया आदि को पार्टी से चुनाव न लड़ाया जाए। इसके मद्देनजर ही आजमगढ़ मण्डल की मऊ विधानसभा सीट से अब मुख्तार अंसारी का नहीं बल्कि यूपी के बीएसपी स्टेट अध्यक्ष श्री भीम राजभर के नाम को फाइनल किया गया है।
— Mayawati (@Mayawati) September 10, 2021
“आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही माफियाला पक्षाचं तिकीट मिळणार नाही, यासाठी आमचा प्रयत्न आहे. यासाठी उत्तर प्रदेशातील आझमगड विधानसभा मतदारसंघातून मुख्तार अन्सारी ऐवजी बसपा प्रदेशाध्यक्ष भीम राजभर यांना तिकीट देण्याचं निश्चित केलं आहे”, असं ट्वीट बसपा अध्यक्ष मायावती यांनी केलं आहे. मायावती यांनी पक्ष प्रभारींना उमेदवारांची निवड करताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सरकार स्थापन केल्यानंतर अशा घटकांवर कठोर कारवाई करताना कोणतीच अडचण नको, म्हणून त्यांनी पक्षातील नेत्यांना ताकीद दिली आहे. दुसरीकडे, बांदा तुरुंगात बंद असलेले आमदार मुख्तार अन्सारी यांच्या मोठ्या भावाने समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. तेव्हापासून मायावती नाराज असल्याचं बोललं जात आहे. मुख्तार अन्सारी मागील विधानसभा निवडणूक बसपाच्या तिकीटावर जिंकले होते. तर त्यांचा भाऊ अफजाल अन्सारी २०१९ मध्ये गाजीपूरमधून बसपाच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले आहेत.