संसदेच्या अधिवेशनादरम्यान शपथ घेताना एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ‘जय पॅलेस्टाईन’ अशी घोषणा दिली होती. त्यांच्या या घोषणानंतर आता नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपाच्या खासदारांनी याचा विरोध केला असून त्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवला आहे. ही घोषणा संविधान विरोधी असल्याचे भाजपाच्या खासदारांनी म्हटलं आहे. त्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनीही हा शब्द रेकार्डवरून काढून टाकणार असल्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा – Parliament Session 2024 LIVE Updates : लोकसभा अध्यक्षांच्या उमेदवारीवरून इंडिया आघाडीत बिनसलं? तृणमूलच्या भूमिकेमुळे पहिल्याच अधिवेशनात राडा?

महत्त्वाचे म्हणजे ‘जय पॅलेस्टाईन’च्या घोषणेनंतर सुरु झालेल्या वादाबाबत आता असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शपथविधीदरम्यान बरेच जण बरंच काही बोलले, मग मी बोललेलं संविधान विरोधी कसं? असा प्रश्न त्यांनी विरोधाकांना विचारला आहे. तसेच त्यांनी ही घोषणा देण्यामागे नेमका उद्देश काय होता? हे देखील सांगिलं आहे. संसद सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?

शपथविधीदरम्यान बरेच जणं बरेच काही बोलले. पण मी फक्त ‘जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय पॅलेस्टाईन’ एवढंच बोललो, मग हे संविधान विरोधी कसं होईल? जय पॅलेस्टाईन बोलू नये अशी तरतूद संविधानात आहे का? असे असेल तर दाखवा. मुळात इतरांनी काय घोषणा दिल्या हेसुद्धा त्यांनी ऐकायला हवं, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांना ही घोषणा देण्यामागे नेमका काय उद्देश होता? याबाबत विचारलं असता, मला जे बोलायचे होते, ते मी बोललो. पॅलेस्टाइनसंदर्भात महात्मा गांधी काय म्हणाले होते एकदा सर्वांनी वाचावं, खरं तर त्या लोकांवर अत्याचार झालेला आहे. त्यामुळे आपण अशी घोषणा दिली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.