एमआयएमचे उत्तर प्रदेशातील अध्यक्ष शौकत अली यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिमांना धमकी देणारे एका महिलेशी लग्न करतात, इतर महिलांशी संबंध ठेवतात आणि त्यातून अवैधपणे मुलं जन्माला घालतात असं वक्तव्य शौकत अली यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशातील संभळ येथे एका सभेला ते संबंधित करत होते. जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शौकत अली यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ते म्हणत आहेत की “मुस्लीन व्यक्तीने दोन लग्न केली तरी ते दोन्ही पत्नींचा समान आदर करतात. पण तुम्ही एक लग्न करता आणि तीन महिलांशी संबंध ठेवता”.

“जेव्हा भाजपाला पराभव दिसतो तेव्हा ते मुस्लिमांना लक्ष्य करतात. मुस्लिमांना खूप मुलं आहेत, ते दोन लग्नं करतात असं ते अनेकदा सांगतात. हो आम्ही दोन लग्नं करतो हे खरं आहे, पण दोन्ही पत्नींना समान आदर देतो. पण तुम्ही लग्न एक करता आणि कोणालाही कळू न देता तीन महिलांशी संबंध ठेवता. तुम्ही एकीलाही आदर देत नाही,” असं शौकत अली म्हणाले.

“भारतात मुस्लिमांपेक्षा भटक्या कुत्र्यांना जास्त मान”, गुजरातमधील ‘त्या’ घटनेवरुन संतापले असदुद्दीन ओवैसी!

यावेळी त्यांनी मुघल सम्राट अकबर आणि जोधाबाई यांच्या विवाहाचाही उल्लेख केला. “आम्ही (मुस्लिमांनी) आमच्यासोबत तुमच्या लोकांना वरती आणलं आणि आता आम्हालाच धमकावत आहात,” अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी मुस्लिमांना धमकावणारे ‘मुघल राजांसमोर झुकणारे किडे आणि किटक’ असल्याचंही म्हटलं.

ते म्हणाले की “तुम्ही आम्हाला धमकावत आहात? आम्ही तुमच्यावर किडे आणि किटकांप्रमाणे ८३२ वर्ष राज्य केलं आहे. आमच्यासमोर तुम्ही ‘जी हुजूर’ करत होतात आणि आता आम्हालाच धमकावत आहात”.

“आमच्यापेक्षा जास्त धर्मनिरपेक्ष कोण आहे? अकबराने जोधाबाईंशी लग्न केलं. आम्ही तुमच्या लोकांनाही आमच्यासोबत वरती नेत आहोत. पण तुम्हाला त्यातही अडचण आहे. मुस्लिमांची हत्या केली पाहिजे असं एका साधूंनी म्हटलं आहे. का? आम्ही काय गाजर, मुळा, कांद्या वाटलो का?,” अशी विचारणाही त्यांनी केली.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शौकत अली यांनी आपण कोणत्याही समाजाचा उल्लेख केला नव्हता असा दावा केला आहे. मी फक्त काही पुरुषांना लक्ष्य करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कोणत्याही समाजाचं मन दुखावण्याचा माझा हेतू नव्हता असं ते म्हणाले आहेत.