वृत्तसंस्था, नवी दिल्ली
एफ-३५ लढाऊ विमानांच्या खरेदीविषयी अमेरिकेने भारताला औपचारिक प्रस्ताव दिलेला नाही अशी माहिती हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला एफ-३५ विमाने विकण्याविषयी विचार मांडला होता. मात्र, अद्याप तसा काही प्रस्ताव मिळाला नसल्याचे हवाई दलप्रमुखांनी स्पष्ट केले.
‘इंडिया टुडे’ या खासगी वृत्तवाहिनीने आयोजित कार्यक्रमात बोलताना एअर चीफ मार्शल सिंग म्हणाले की, भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याची आणि पाचव्या पिढीतील लढाऊ विमान खरेदीच्या कार्यक्रमाला गती देण्याची गरज आहे. हवाई दलाने अद्याप एफ-३५ विमानांचे विश्लेषण केलेले नाही आणि त्याच्या किंमतीवरही विचार करण्याची गरज आहे. आपल्या गरजा आणि विमानाची वैशिष्ट्ये विचारात घेतली जातील असे ते म्हणाले. विमानाची किंमत जवळपास ८ कोटी डॉलर इतकी असून ते जगातील सर्वात महागड्या लढाऊ विमानांपैकी एक आहे. त्यांच्या कामगिरीवरही शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत असे त्यांनी सांगितले.