महिलांचा लढाऊ विमानांच्या वैमानिक म्हणून समावेश करून त्यांना योद्धय़ांची भूमिका देण्याची भारतीय वायुदलाची योजना असल्याची माहिती वायुदलप्रमुखांनी गुरुवारी येथे दिली.
आमच्याकडे वाहतूक विमाने व हेलिकॉप्टर्स चालवणाऱ्या महिला वैमानिक आहेत. देशातील तरुण महिलांच्या आकांक्षाची पूर्तता करण्यासाठी त्यांना लढाऊ शाखेत (फायटर स्ट्रीम) सहभागी करण्याचा आम्ही विचार करीत आहोत, असे वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी वायुदलाच्या ८३व्या वर्धापन दिनानिमित्त वायुदलाच्या कर्मचाऱ्यांना संबोधित करताना सांगितले.
महिलांनी प्रत्यक्ष युद्धस्थितीमध्ये काम करण्यात आपल्याला काहीही विसंगत वाटत नसल्याचे सांगून वायुदलप्रमुखांनी या कृतीचे ‘पुरोगामी पाऊल’ असे वर्णन केले. वायुदलाचा याबाबतचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे असून, एकदा त्याला मान्यता मिळाली की संपूर्णपणे सज्ज अशा लढाऊ विमानाच्या महिला वैमानिक तयार होण्यास किमान ३ वर्षे लागतील, असे राहा यांनी पत्रकारांना सांगितले.
संरक्षण दलाच्या तीन सेवांमध्ये (भूदल, नौदल, वायुदल) लढाऊ विभागात महिलांना सहभागी करण्याबाबत वायुदलाने सर्वप्रथम विचार केला आहे. यापूर्वी महिलांनी युद्धामध्ये भाग घेण्यास सैन्यात अनुकूलता नव्हती.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी यापूर्वी मे महिन्यात, महिलांच्या सुरक्षेच्या चिंतेमुळे त्यांना लष्करातील युद्ध मोहिमांमध्ये नियुक्त करण्याची शक्यता नाकारली होती, मात्र त्यांना इतर परिचालन विभागांमध्ये सामील करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल असे म्हटले होते.महिला वैमानिकांना सीमेपलीकडे शत्रूने लक्ष्य केल्यास काय करणार, असे विचारले असता महिला वैमानिक सीमेपलीकडे जातीलच असे नाही, असे वायुदलप्रमुख उत्तरले. देशामध्येही लढाऊ विमाने आणि वैमानिकांसाठी आमच्याकडे हवाई संरक्षण, प्रशिक्षण, प्रशिक्षित फ्लाइंग इन्स्ट्रक्टर यांसारखी बरीच कामे आहेत. मात्र, प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेसही महिलांनी लढण्यात मला काहीही वावगे वाटत नाही, असे राहा यांनी सांगितले.वायुदलात सध्या कार्यरत असलेल्या १३०० महिलांपैकी ९४ वैमानिक आणि १४ नॅव्हिगेटर (नौदलातील वैमानिक) आहेत. ही योजना प्रत्यक्षात आली, तर भारतीय वायुदलाला लढाऊ विमान शाखेत अधिकाऱ्यांच्या कमतरतेवर मात करण्यासही मदत होईल.
वायुदलाचा याबाबतचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे असून, एकदा त्याला मान्यता मिळाली की संपूर्णपणे सज्ज अशा लढाऊ विमानाच्या महिला वैमानिक तयार होण्यास किमान ३ वर्षे लागतील
भारतीय वायुसेनेची स्थापना ८ ऑक्टोबर १९३२ रोजी ब्रिटीश राजवटीत झाली होती. तेव्हा वायुसेनेला ‘रॉयल इंडियन एअर फोर्स’ असं संबोधले जात असे. स्वातंत्र्यानंतर त्याचं ‘इंडियन एअरफोर्स’ असं नामकरण करण्यात आले.